अश्विनीच्या आठवणींनी डोळे पाणावले; कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी जि.प. अध्यक्षा अर्चनाताईं पाटीलचा निर्धार


उमरगा, दि. ७ सप्टेंबर : 

शालेय जीवनापासूनच कुस्तीच्या मैदानावर जिद्द, मेहनत आणि स्वकर्तृत्वाच्या जोरावर ठसा उमटविणाऱ्या दिवंगत कुस्तीपटू कै. अश्विनी मोहिते-पौळ यांच्या आकस्मिक निधनाने मन हेलावून गेले आहे. नळदुर्ग किल्ल्यावर घडलेली दुर्दैवी घटना आणि त्यात अश्विनीसह तिच्या तीन चिमुकल्या मुलांचा झालेला मृत्यू ही बाब अत्यंत वेदनादायी आहे, अशा भावना धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केल्या.
सौ. अर्चनाताई पाटील यांनी रविवार दि.६ सप्टेंबर रोजी उमरगा तालुक्यातील व्हांताळ येथे अश्विनीचे वडिल तानाजी मोहिते , आई सौ.सुरेखा तानाजी मोहिते यांची  भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

 यावेळी माजी खासदार रवींद्र गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य सौ. सविताताई बिराजदार, राहुल पाटील सास्तुरकर, सौ. शीतलताई राहुल पाटील सास्तुरकर, सरपंच माधव जाधव, तंटामुक्ती अध्यक्ष महेश पाटील ,यांच्यासह ग्रामस्थ  उपस्थित होते.

कुटुंबीयांनी अश्विनीच्या शालेय जीवनातील कुस्ती स्पर्धांमध्ये मिळविलेली सुवर्णपदके तसेच विविध ठिकाणी झालेल्या सत्कारांचे जुने छायाचित्रे दाखविली. ही छायाचित्रे पाहताना तिचे जिद्दी, गुणी आणि धडाडीचे व्यक्तिमत्त्व डोळ्यांसमोर उभे राहिले. लेडीज क्लब, धाराशिवच्या वतीने उपमुख्यमंत्री सुनेत्राताई यांच्या हस्ते झालेला तिचा सत्कार तसेच आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केलेला सन्मान या आठवणींनीही मन भरून आले.

अश्विनीच्या मृत्यूमागचे सत्य समोर आलेच पाहिजे
घटना घडल्यानंतर त्याच दिवशी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी नळदुर्गच्या पोलीस निरीक्षकांशी संपर्क साधून प्रकरणाचा सखोल तपास करून सत्य परिस्थिती समोर आणावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत. अश्विनीच्या मृत्यूमागचे सत्य समोर येऊन तिच्या कुटुंबीयांना न्याय मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची आपली भूमिका ठाम असल्याचे अर्चनाताई पाटील यांनी सांगितले.

अश्विनीचे कर्तृत्व, तिची जिद्द, तिचे हसरे व्यक्तिमत्त्व आणि तिच्या डोळ्यांतील स्वप्ने आठवली की मन भरून येते. या दुःखद प्रसंगी आपण अश्विनीच्या कुटुंबीयांसोबत असून त्यांच्या दुःखात सहभागी असल्याचेही त्यांनी नमूद केले.

अश्विनी तसेच तिच्या तिन्ही चिमुकल्या लेकरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून ईश्वराने त्यांच्या कुटुंबीयांना हे अतीव दुःख सहन करण्याची शक्ती द्यावी, अशी प्रार्थनाही त्यांनी केली.
 
Top