अलियाबाद पुलाच्या शौर्यभूमीला स्मृती उद्यानाची नवी ओळख!
आमदार राणाजगजितसिंह पाटील.

८.५ हेक्टरवर ३० कोटींचा प्रस्ताव; शहीद बचित्तरसिंहांसह मुक्तिसंग्रामातील ज्ञात-अज्ञात वीरांच्या स्मृती जपणार

नळदुर्ग, दि. १७ सप्टेंबर :

मराठवाडा मुक्ती संग्रामातील शौर्याचा साक्षीदार असलेल्या नळदुर्गच्या ऐतिहासिक अलियाबाद पुलाला आता भव्य स्मृती उद्यानाची जोड मिळण्याची शक्यता आहे. शहीद जवान बचित्तरसिंह यांच्या अतुलनीय शौर्याची गाथा आणि मराठवाडा मुक्ती संग्रामाचा इतिहास भावी पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी अलियाबाद पुलालगत सुमारे ८.५ हेक्टर क्षेत्रावर ३० कोटी रुपये खर्चाचे स्मृती उद्यान उभारण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करण्यात आला आहे. आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी ही माहिती दिली.
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त गुरुवारी अलियाबाद पुलावर शहीद जवान बचित्तरसिंह यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला. यावेळी अप्पर तहसीलदार प्रमोद गायकवाड, नगराध्यक्ष बसवराज धरणे, उपनगराध्यक्ष नय्यर जहागिरदार, जि.प. परिषद बांधकाम व अर्थ सभापती सिध्देश्वर कोरे, प.स. समितीचे सदस्य अँड आशिष सोनटक्के, कल्याण बिराजदार, गटनेते दत्तात्रय दासकर, पाणीपुरवठा सभापती तानाजी जाधव, बांधकाम सभापती शशिकांत पुदाले, पोलिस निरीक्षक रवींद्र गायकवाड, नगरसेवक रिजवान काझी, निरंजन राठोड, नगरसेविका छमाबाई राठोड, माजी नगरसेवक किशोर नळदुर्गकर, विनायक अहंकारी, दत्तात्रय कोरे, धिमाजी घुगे,उमेश नाईक ,अक्षय भोई, श्रमिक पोतदार, सुनील (बबन) चौधरी,  पद्माकर घोडके, स्वकीय साहाय्यक  अबुलहसन रजवी आदी उपस्थित होते.


दारुगोळ्याचा स्फोट रोखताना बलिदान
निजामाच्या राजवटीतून मराठवाड्याची मुक्तता करण्याच्या लढ्यात १३ सप्टेंबर १९४८ रोजी बचित्तरसिंह यांनी शौर्यपूर्ण बलिदान दिले. अलियाबाद पूल उडविण्यासाठी रझाकारांनी ठेवलेल्या दारुगोळ्याचा स्फोट रोखण्यासाठी त्यांनी जीवाची पर्वा न करता धाडसी कारवाई केली. या प्रयत्नात गंभीर जखमी झाल्यानंतर त्यांना वीरमरण आले. त्यांच्या शौर्याची दखल घेत भारत सरकारने त्यांना मरणोत्तर अशोकचक्राने सन्मानित केले.

ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मृती जपणार
अलियाबाद पुलाशेजारील शासकीय गायरान जागेवर प्रस्तावित स्मृती उद्यानात सरदार वल्लभभाई पटेल, शहीद बचित्तरसिंह तसेच मराठवाडा मुक्ती संग्रामातील ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांच्या शौर्य, त्याग व योगदानाच्या स्मृती जतन करण्याची संकल्पना आहे. स्मृती उद्यान साकार झाल्यास अलियाबाद पुलाची ऐतिहासिक ओळख अधिक अधोरेखित होऊन युवा पिढीला मराठवाडा मुक्ती संग्रामाचा इतिहास प्रत्यक्ष स्मृतीस्थळाच्या माध्यमातून जाणून घेण्याची संधी मिळणार आहे.
 
Top