गणेशोत्सवात उभा राहिला नळदुर्गच्या शौर्याचा इतिहास!
आलियाबाद पुलावरील मुक्तिसंग्रामाच्या रणकथेपासून पंढरीच्या वारीपर्यंत; विनायक अहंकारी यांच्या घरातील सजावटीने वेधले लक्ष
नळदुर्ग, दि. १८ सप्टेंबर :
गणरायाच्या आगमनाचा उत्सव केवळ भक्तीपुरता मर्यादित न ठेवता इतिहास, संस्कृती आणि ग्रामीण जीवनाची सांगड घालत नळदुर्गचे सामाजिक कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक विनायक अहंकारी यांनी आपल्या निवासस्थानी साकारलेली देखणी सजावट यंदाच्या गणेशोत्सवाचे विशेष आकर्षण ठरली आहे. त्यांच्या घरातील गणेशमूर्तीसमोर उभ्या राहिलेल्या देखाव्यांतून नळदुर्गच्या इतिहासाची पाने जणू पुन्हा जिवंत झाली आहेत.
मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या धगधगत्या आठवणींना उजाळा देताना नळदुर्गच्या ऐतिहासिक आलियाबाद पुलावर निजामच्या रजाकार आणि भारतीय सैनिक यांच्यात झालेल्या संघर्षाचा हुबेहूब देखावा साकारण्यात आला आहे. रणभूमीतील संघर्ष, तत्कालीन परिस्थिती आणि स्वातंत्र्यलढ्याची जाज्वल्य स्मृती या देखाव्यातून प्रभावीपणे मांडण्यात आली आहे. त्यामुळे गणरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना भक्तीसोबत इतिहासाचेही दर्शन घडत आहे.
याचबरोबर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविणारा ‘पंढरीची वारी’ हा देखावाही लक्षवेधी ठरला आहे. वारकऱ्यांची भक्तिभावाने निघालेली दिंडी, विठ्ठलनामाचा गजर आणि पंढरीच्या वारीची आध्यात्मिक अनुभूती यामुळे परिसराला भक्तिरसाची किनार लाभली आहे.
सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या साक्षीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची गाथा उलगडणारा देखावाही सजावटीचे वैभव वाढवितो. त्यासोबतच ग्रामीण महाराष्ट्राच्या मातीत रुजलेले जीवन, गावगाडा, परंपरा आणि संस्कृती यांचे दर्शन घडविणारा देखावा साकारण्यात आला आहे. इतिहासापासून संस्कृतीपर्यंत आणि स्वराज्यापासून गावकुसातील जीवनापर्यंतचा प्रवास या सजावटीतून अनुभवता येत आहे.
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी घेतले गणरायाचे दर्शन
गुरुवारी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी अहंकारी यांच्या निवासस्थानी भेट देऊन श्री गणेशाचे दर्शन घेतले. त्यांनी सजावटीची पाहणी करून या अभिनव संकल्पनेचे कौतुक केले.
यावेळी नळदुर्गचे नगराध्यक्ष बसवराज धरणे, उपनगराध्यक्ष नय्यर जागीरदार, नगरसेवक दत्तात्रय दासकर, मारुती खारवे, तानाजी जाधव, निरंजन राठोड, आकाश कुलकर्णी, सुधीर पोतदार, नगरसेविका छमाबाई राठोड,माजी नगरसेवक किशोर नळदुर्गकर,पत्रकार विलास येडगे, संजय जाधव, राजेंद्र महाबोले, उमेश जाधव, महेंद्र डुकरे, बंडोपंत कसबेकर यांच्यासह नागरिक व भाविक उपस्थित होते.
ही वैशिष्ट्यपूर्ण सजावट पाहण्यासाठी शहरातील नागरिकांची मोठी गर्दी होत असून, गणरायाच्या दर्शनासोबत नळदुर्गच्या इतिहासाची आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाची सफर घडत असल्याची भावना भाविकांकडून व्यक्त होत आहे.
या संकल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी श्रीनिवास अहंकारी, राजकुमार वैद्य, प्रदीप ग्रामोपाध्ये, सौरभ रामदासी आणि नंदू पोतदार यांचे सहकार्य लाभले.