अनेक महिन्यांपासून आरओ प्लांट बंद;
वसंतनगर-दुर्गानगरकरांचा पालिकेला आठ दिवसांचा अल्टिमेटम; ७ ऑक्टोबरला उपोषणाचा इशारा
नळदुर्ग, दि. २९ सप्टेंबर :
शहरातील वसंतनगर - दुर्गानगर येथील नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी आमदार निधीतून सुमारे चार लाख रुपये खर्च करून उभारण्यात आलेला आरओ प्लांट गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहे. सार्वजनिक निधीतून उभारलेली सुविधा वापराविना पडून असल्याने वसंतनगर-दुर्गानगर परिसरातील नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. प्लांट आठ दिवसांत सुरू न झाल्यास दि. ७ ऑक्टोबर रोजी नगरपरिषद कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा रवी महाराज राठोड व नागरिकांनी दिला आहे.
वसंतनगर परिसरातील नागरिकांना शुद्ध व थंड पिण्याचे पाणी मिळावे, या उद्देशाने हा आरओ प्लांट उभारण्यात आला होता. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून तो बंद असल्याने योजनेचा मूळ उद्देशच बाधित झाला आहे. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना इंदिरानगर परिसरात जावे लागत असल्याने रोजच्या गरजेच्या पाण्यासाठीही त्यांना अंतर कापावे लागत आहे.
पाण्याचा स्रोत जवळ, तरीही प्लांट बंद
आरओ प्लांटच्या शेजारीच नगरपरिषदेने विंधन विहीर घेतली असून त्यास मुबलक पाणी आहे. त्यामुळे पाण्याची उपलब्धता असतानाही आरओ प्लांट बंद का ठेवण्यात आला आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. प्लांटच्या देखभाल-दुरुस्तीबाबत नगरपरिषद प्रशासनाने तातडीने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही होत आहे.
आरओ प्लांटची तातडीने पाहणी करून आवश्यक दुरुस्ती करावी आणि नागरिकांसाठी तो नियमितपणे सुरू करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर यांच्याकडे करण्यात आली आहे. आठ दिवसांत प्लांट सुरू न झाल्यास दि. ७ ऑक्टोबर रोजी नगरपरिषद कार्यालयासमोर श उपोषण करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
चार लाख रुपये खर्चून उभारलेल्या या सुविधेचा नागरिकांना लाभ मिळत नसल्याने आरओ प्लांट बंद असण्याचे कारण, त्याच्या देखभालीची जबाबदारी आणि तो सुरू करण्यासाठी करण्यात आलेली कार्यवाही याबाबत नगरपरिषद प्रशासनाने माहिती देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
निवेदनावर रवी महाराज राठोड, संजय जाधव, दिलीप राठोड, गणेश राठोड, हनुमंत दुर्लेकर,मोहन राठोड, शेखर राठोड आदीच्या स्वाक्षरी आहेत.