आलियाबाद शिवारात दुष्काळी पंचनाम्यांना सुरुवात ; प्रशासनाची बांधावर धाव; पिकांसह चारा-पाण्याच्या संकटाने शेतकरी हवालदिल

नळदुर्ग, दि. ३० सप्टेंबर :

तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून नुकसानग्रस्त पिकांचे प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन पंचनामे करण्यास सुरुवात झाली आहे. बुधवारी आलियाबाद शिवारात महसूल व कृषी विभागाच्या पथकाने भेट देत शेतातील पिकांची पाहणी करून नुकसानीची नोंद केली.

शासनाने दुष्काळ जाहीर केल्यानंतर दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने तालुक्यात ‘ट्रिगर प्रथम’ लागू झाल्याने नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. पावसाने दडी मारल्यामुळे खरीप हंगामातील हातातोंडाशी आलेली पिके संकटात सापडली आहेत. त्यातच जनावरांसाठी चारा आणि पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट उभे ठाकले आहे.

आलियाबाद शिवारात प्रशासनाच्या पथकाने प्रत्यक्ष शेतात जाऊन पिकांची पाहणी केली. पिकांची सद्यस्थिती, झालेल्या नुकसानीचे स्वरूप आणि बाधित क्षेत्राची नोंद घेण्यात आली. या पंचनाम्याच्या आधारे शासनाच्या दुष्काळी उपाययोजनांचा लाभ संबंधित शेतकऱ्यांना मिळण्यास मदत होणार आहे.
पावसाअभावी पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. उत्पादन हातातून गेल्याने पुढील हंगामासाठी भांडवलाचा प्रश्न निर्माण झाला असून, जनावरांच्या चारा-पाण्याची व्यवस्थाही अडचणीची ठरत आहे. त्यामुळे पंचनाम्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करून शासनाने दुष्काळी मदत व इतर सवलतींचा लाभ मिळवून द्यावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रकाश चव्हाण, पोलीस पाटील शिवाजी चव्हाण, यशवंतराव चव्हाण, माणिक राठोड, थावरू राठोड, गणपती राठोड, हरिदास चव्हाण, देविदास राठोड, काशीनाथ जाधव, रवि चव्हाण, विनोद चव्हाण, सुनील राठोड, शिवाजी चव्हाण, कृषी सहायक संतोष माने, ग्रामसेवक अविनाश खुटेंगावे यांच्यासह शेतकरी व महिला उपस्थित होत्या.

 
Top