सेवा, शिस्त आणि सहकार्याचा संदेश; नळदुर्ग येथे संत निरंकारी सेवादलाचे प्रशिक्षण शिबिर
मुरुम/ नळदुर्ग, दि. ३ ऑक्टोंबर:
महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त नळदुर्ग व मुरूम ब्रँचच्या संयुक्त विद्यमाने नळदुर्ग येथील अंबाबाई मंदिर सभागृहात संत निरंकारी सेवादलाचे प्रशिक्षण शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. शिस्त, सेवा, नियोजन आणि सहकार्य या मूल्यांवर प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूरचे क्षेत्रीय संचालक बाळासाहेब पवार होते. वस्त्र मंत्रालयाचे निवृत्त प्रादेशिक व्यवस्थापक डॉ. शिवाजी शिंदे, मुरूम रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ. महेश मोटे, येळीचे प्रबंधक हरिकिशन पवार, सामाजिक कार्यकर्ते धनराज शिंदे, बलसूरचे प्रबंधक युवराज बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुरूम ब्रँचच्या दशकपूर्तीचा सोहळा
मुरूम ब्रँचला दहा वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने दशकपूर्ती सोहळाही यावेळी साजरा करण्यात आला. तसेच मुरूम येथील मीरा मोटे व सेवादल सदस्य सार्थक बोडरे यांचा वाढदिवस केक कापून व सत्कार करून साजरा करण्यात आला. मीरा मोटे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
दिवंगत सिद्राम गंगाराम शिंदे यांच्या स्मरणार्थ शिंदे परिवाराच्या वतीने संत निरंकारी सेवादलातील माता-बहिनजींना मान्यवरांच्या हस्ते उपयुक्त बॅगांचे वाटप करण्यात आले.
निस्वार्थ सेवेचे महत्त्व अधोरेखित
दिवसभर झालेल्या प्रशिक्षणात क्षेत्रीय संचालक बाळासाहेब पवार यांनी संत निरंकारी मिशनचे नियम, व्यवस्थापन, नियोजन, शिस्त, अटी तसेच निस्वार्थ सेवेचे महत्त्व याबाबत सेवादल महापुरुष व बहिनजींना सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी मान्यवरांनी संत निरंकारी मिशनच्या मानवतावादी विचारांवर तसेच समाजोपयोगी कार्यात सेवादलाची भूमिका यावर विचार मांडले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी नळदुर्गचे सेवादल इन्चार्ज रोहित विभुते, मुरूमचे सेवादल इन्चार्ज बिरू बंदीछोडे, अभिजीत रुपनर, अभिषेक चव्हाण, वासू पवार, शिवानंद बिराजदार, दत्तात्रेय बोडरे, प्रमोद नारायणकर, ज्ञानेश्वर काळे, सुरेखा कांबळे, उषा साखरे, कमल शेवाळे, सुनीता व्हटकर, अनुसया नारायणकर, वैभव कटके आदींनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुरूमचे दयानंद साखरे यांनी केले, तर नळदुर्गचे सुनील पिसके यांनी आभार मानले. शिबिरास सेवादलातील महापुरुष व बहिनजींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.