आई-वडिलांची माया नाही; पण माणुसकीची ऊब मिळाली; ‘आपलं घर’मधील निराधार बालकांसाठी आळंदीहून आरोग्यसेवेची मायेची गंगा; १०० जणांची मोफत तपासणी
नळदुर्ग, दि. ४ ऑक्टोंबर :
आई-वडिलांच्या मायेपासून वंचित असलेल्या निराधार बालकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आळंदी येथील संत चोखामेळा आरोग्य केंद्राने नळदुर्ग येथील ‘आपलं घर’ बालगृहात मायेचा हात पुढे केला. सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीच्या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिरात बालकांसह सुमारे १०० जणांची तपासणी करण्यात आली.
धाराशिव व लातूर जिल्हा बालकल्याण समितीचे सदस्य तथा पत्रकार दयानंद काळुंके यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी संत चोखामेळा आरोग्य केंद्राचे अधीक्षक डॉ. विजय महाजन, ‘आपलं घर’ व्यवस्थापन समितीचे सचिव गोरख जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती.
‘आपलं घर’मधील ८० बालकांसह कर्मचारी अशा सुमारे १०० जणांची रक्तगट व हिमोग्लोबीन तपासणी करण्यात आली. यासोबतच डोळे, दात, कान-नाक-घसा, त्वचा, रक्तदाब, मधुमेह आदींची तपासणी करण्यात आली. आवश्यकतेनुसार औषधोपचार, आरोग्यविषयक मार्गदर्शन आणि समुपदेशनही करण्यात आले.
आरोग्यासोबत संस्कारांचीही शिदोरी
आरोग्य तपासणीबरोबरच बालकांच्या मनावर संस्कारांची बीजे रुजविण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला. वृध्दांवन फाऊंडेशनचे अध्यक्ष सचिन पाटील यांच्या वतीने ‘आपलं घर’मधील ८० बालकांना ‘श्यामची आई’ या संस्कारक्षम पुस्तकाचे वाटप करण्यात आले. त्यामुळे आरोग्यसेवेबरोबरच मुलांच्या हातात ज्ञान, विचार आणि संस्कारांची शिदोरी देण्यात आली.
‘ही केवळ आरोग्यसेवा नव्हे, माणुसकीची गंगा’
यावेळी दयानंद काळुंके म्हणाले, “या मुलांना आई-वडिलांची माया मिळाली नाही, ही त्यांची चूक नाही. मात्र समाजाने त्यांना मायेची ऊब देणे ही आपली जबाबदारी आहे. त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे, चेहऱ्यावर आनंद फुलविणे आणि ‘आपण एकटे नाही’ ही भावना त्यांच्या मनात निर्माण करणे, हेच खरे सामाजिक कार्य आहे. आळंदीहून ‘आपलं घर’पर्यंत पोहोचलेली ही आरोग्यसेवा म्हणजे केवळ तपासणीचे शिबिर नसून माणुसकीची आरोग्यगंगा आहे.”
या उपक्रमामुळे बालकांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद दिसून आला. निराधार बालकांच्या पाठीशी समाजातील संवेदनशील व्यक्तींनी उभे राहावे, असे आवाहनही काळुंके यांनी केले.
शिबिरात डॉ. विजय महाजन व सौदागर भोसले यांनी आरोग्य तपासणी व उपचार केले. कार्यक्रमाचे संयोजन साथी संतोष बुरंगे यांनी केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी ‘आपलं घर’चे अधीक्षक संदीप चवले, स्मिता फडणीस, सविता अवचार, उमादेवी स्वामी, अरुणा कानडे, अर्चना देडे व विश्वनाथ कानडे यांनी परिश्रम घेतले.