श्री तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी वाहतुकीत मोठे बदल!
२३ ते २६ ऑक्टोबरदरम्यान तुळजापूरकडे येणारे प्रमुख मार्ग बंद; १४ मार्गांवरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविली
तुळजापूर, दि. २२ ऑक्टोंबर : शिवाजी नाईक
श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त कोजागिरी पौर्णिमा व मंदिर पौर्णिमेसाठी तुळजापुरात लाखो भाविक दाखल होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने वाहतुकीत मोठे बदल केले आहेत. शुक्रवार, दि. २३ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १२.०१ वाजल्यापासून सोमवार, दि. २६ ऑक्टोबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत तुळजापूर शहराकडे येणाऱ्या तसेच शहरातून जाणाऱ्या प्रमुख मार्गांवरील हलकी व जड वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.
जिल्हादंडाधिकारी कीर्ती किरण पुजार आणि पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ३३ (१) (ब) अन्वये हा आदेश जारी केला आहे.
सात ते आठ लाख भाविक पायी येण्याची शक्यता
कोजागिरी पौर्णिमेच्या आदल्या दिवशी, पौर्णिमेच्या दिवशी आणि त्यानंतरच्या दिवशी म्हणजेच २४ ते २६ ऑक्टोबरदरम्यान सोलापूर, नळदुर्ग, लातूर आणि धाराशिव या मार्गांवरून सुमारे सात ते आठ लाख भाविक पायी तुळजापूरला येण्याची शक्यता आहे. लांब पल्ल्याचा प्रवास करून येणारे भाविक रस्त्याच्या कडेला विश्रांतीसाठी थांबतात किंवा झोपतात. अशा परिस्थितीत धुळे-सोलापूर, तुळजापूर-लातूर आणि तुळजापूर-नळदुर्ग मार्गांवरील जड वाहतुकीमुळे अपघात होण्याचा धोका आहे.
भाविकांची सुरक्षितता, वाहतूक कोंडी टाळणे आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे.
या मार्गांवरील वाहतुकीत बदल
प्रशासनाच्या आदेशानुसार धाराशिव-हैदराबाद, हैदराबाद-धाराशिव, हैदराबाद-छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर-हैदराबाद, धाराशिव-सोलापूर, सोलापूर-धाराशिव, लातूर-सोलापूर, सोलापूर-लातूर, छत्रपती संभाजीनगर-सोलापूर, सोलापूर-छत्रपती संभाजीनगर, तुळजापूर-सोलापूर, सोलापूर-तुळजापूर, तुळजापूर-बार्शी आणि बार्शी-तुळजापूर या १४ मार्गांवरील वाहतूक नेहमीच्या मार्गाऐवजी पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.
वाहनधारकांसाठी पर्यायी मार्ग
धाराशिव–हैदराबाद : धाराशिव–औसा–उमरगा–हैदराबाद.
हैदराबाद–धाराशिव : उमरगा–औसा–धाराशिव.
हैदराबाद–छत्रपती संभाजीनगर : उमरगा–औसा–लातूर–अंबाजोगाई–मांजरसुंबा–बीडमार्गे छत्रपती संभाजीनगर. पर्यायी मार्ग म्हणून उमरगा–औसा–लातूर–मुरूड–ढोकी–येडशी–बीड हा मार्गही दिला आहे.
छत्रपती संभाजीनगर–हैदराबाद : छत्रपती संभाजीनगर–बीड–मांजरसुंबा–अंबाजोगाई–लातूर–औसा–उमरगा–हैदराबाद. पर्यायी मार्गाने बीड–येडशी–ढोकी–मुरूड–लातूर–औसा–उमरगा असा प्रवास करता येईल.
धाराशिव–सोलापूर व सोलापूर–धाराशिव : वैरागमार्गे वाहतूक वळविण्यात येणार आहे.
लातूर–सोलापूर : मुरूड–ढोकी–येडशी–बार्शी–सोलापूर.
सोलापूर–लातूर : सोलापूर–बार्शी–येडशी–ढोकी–मुरूड–लातूर.
छत्रपती संभाजीनगर–सोलापूर : येरमाळा–बार्शी–सोलापूर.
सोलापूर–छत्रपती संभाजीनगर : सोलापूर–बार्शी–येरमाळा.
तुळजापूर–सोलापूर : मंगरूळ पाटी–इटकळ–बोरामणी–सोलापूर.
सोलापूर–तुळजापूर : सोलापूर–बोरामणी–इटकळ–मंगरूळ पाटी–तुळजापूर.
तुळजापूर–बार्शी : तुळजापूर–धाराशिव–बार्शी.
बार्शी–तुळजापूर : बार्शी–वैराग–धाराशिव–तुळजापूर.
अत्यावश्यक सेवांना बंधनातून सूट
वाहतूक बदलाचे हे निर्बंध पोलीस, रुग्णवाहिका, अग्निशमन दल, अत्यावश्यक सेवांतील वाहने आणि एसटी बस यांना लागू राहणार नाहीत. भाविकांची सुरक्षितता आणि वाहतुकीचे सुरळीत नियमन करण्यासाठी वाहनधारकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.