तुळजाभवानीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी नळदुर्ग नगरपालिकेचा सेवाभाव!
हुतात्मा निलय्या स्वामी उद्यानाची स्वच्छता; भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणार
नळदुर्ग, दि. २२ ऑक्टोंबर :
कोजागिरी पौर्णिमेनिमित्त श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी राज्यासह परराज्यांतून हजारो भाविक अनवाणी पायी तुळजापूरकडे मार्गक्रमण करीत आहेत. या पदयात्रेकरुना थकवा दूर करून विश्रांती घेता यावी, यासाठी नळदुर्ग नगरपालिकेच्या वतीने गुरुवारी (दि. २२) हुतात्मा निलय्या स्वामी उद्यानात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
दरवर्षी शेकडो किलोमीटरचे अंतर पायी अनवाणी पार करीत भाविक नळदुर्गमार्गे श्री क्षेत्र तुळजापूरला जातात. या भाविकांच्या सोयीसाठी नगराध्यक्ष बसवराज धरणे यांनी उद्यानाची पाहणी केली. जेसीबीच्या साहाय्याने उद्यानातील पालापाचोळा, वाळलेले गवत आणि झुडपे हटविण्यात आली. नगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी परिसर स्वच्छ करून उद्यान भाविकांच्या विश्रांतीसाठी सज्ज केले आहे.
उद्यानाचे सुशोभीकरण करणार : धरणे
तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना या उद्यानात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भविष्यात उद्यानाचे सुशोभीकरण करून भाविकांसाठी आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नगराध्यक्ष बसवराज धरणे यांनी सांगितले.
यावेळी नगरपालिकेतील गटनेते तथा नगरसेवक दत्तात्रय दासकर, बलदेव ठाकूर, नगरसेवक निरंजन राठोड, पाणीपुरवठा सभापती तानाजी जाधव, माजी नगरसेवक किशोर नळदुर्गकर तसेच नगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते.