माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांची पोहरादेवीला भेट; बंजारा विरासत संग्रहालयाची पाहणी; समाजाचा गौरवशाली इतिहास आणि सांस्कृतिक वारशाची घेतली माहिती
पोहरादेवी, दि. १ सप्टेंबर :
भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी रविवारी तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे भेट देऊन बंजारा विरासत संग्रहालयाची पाहणी केली. यावेळी त्यांचे स्वागत राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केले.
यावेळी त्यांनी बंजारा समाजाचा समृद्ध इतिहास, सांस्कृतिक परंपरा आणि ऐतिहासिक वारशाची माहिती जाणून घेतल्याची माहिती बंजारा विरासतचे तथा मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड चे समर्थक सचिन राठोड यांनी दिली.
संग्रहालयातील बंजारा समाजाचा गौरवशाली इतिहास, तांडा संस्कृती, लोककला, पारंपरिक वेशभूषा तसेच संत-महापुरुषांचे योगदान दर्शविणाऱ्या विविध दालनांची त्यांनी पाहणी केली. आधुनिक डिजिटल माध्यमातून सादर केलेली ऐतिहासिक माहिती, पारंपरिक वस्तू आणि सांस्कृतिक ठेव्याची आकर्षक मांडणी यांचीही त्यांनी माहिती घेतली.
बंजारा समाजाची समृद्ध परंपरा, संस्कृती आणि ऐतिहासिक वारसा जतन करून तो नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने संग्रहालयाच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची सविस्तर माहिती यावेळी देण्यात आली.
या भेटीप्रसंगी न्यायमूर्ती अनिल किशोर, न्यायमूर्ती जोशी, न्यायाधीश प्रवीण पाटील, न्यायाधीश राज वाकोडे, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, यवतमाळचे प्रधान जिल्हा न्यायाधीश आनंद यावलकर, महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष ॲड. जयंत जायभावे, उपाध्यक्ष ॲड. रंजना मोतले, ॲड. आशिष देशमुख, सौ. मोहिनीताई नाईक, ॲड. भारत जाधव, ॲड. दामिनी राठोड यांच्यासह पोहरादेवी येथील महंत आणि वकील संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.