केमिस्ट असोसिएशनच्या निवडणुकीत १३ जागांसाठी २७ उमेदवार रिंगणात!
पाच तालुक्यांत बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा; २४ नोव्हेंबरला मतदान, अध्यक्षपदासाठी चार अर्ज

अणदूर, दि. ११ नोव्हेंबर :

 धाराशिव जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या पंचवार्षिक निवडणुकीचे रणांगण तापू लागले आहे. जिल्ह्यातील १३ जागांसाठी तब्बल २७ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. दरम्यान, तुळजापूर, वाशी, भूम, परांडा आणि लोहारा या पाच तालुक्यांत तालुकाध्यक्षपदासाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने या जागा बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

 उर्वरित जागांवरील लढतीकडे जिल्ह्यातील औषध व्यावसायिकांचे लक्ष लागले आहे.
औषध विक्रेत्यांची जिल्हास्तरीय संघटना म्हणून ओळख असलेल्या या असोसिएशनची पंचवार्षिक निवडणूक २४ नोव्हेंबर रोजी होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी एकूण २७ अर्ज प्राप्त झाले. यामध्ये अध्यक्षपदासाठी चार, उपाध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष आणि सहसचिव या प्रत्येक पदासाठी प्रत्येकी तीन अर्ज दाखल झाले आहेत. उर्वरित आठ तालुका अध्यक्षपदांसाठी अर्ज दाखल झाले आहेत.

तालुकानिहाय अर्जांची संख्या पुढीलप्रमाणे : धाराशिव दोन, तुळजापूर एक, उमरगा दोन, कळंब दोन, भूम एक, परांडा एक, वाशी एक आणि लोहारा एक. पाच तालुक्यांत प्रतिस्पर्धी उमेदवार नसल्याने बिनविरोध निवडीची शक्यता निर्माण झाली आहे. सत्ताधारी आनंदे पॅनलने पाच जागा बिनविरोध करण्याच्या दिशेने आघाडी घेतली आहे.

गुरुवार, १२ नोव्हेंबर रोजी अर्जांची छाननी होणार असून, १३ नोव्हेंबर ही अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. त्यानंतर निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲड. दयानंद बिराजदार काम पाहत आहेत.

दरम्यान, ८ फार्मा ग्रुपच्या वतीने नळदुर्ग येथील संजीवनी मेडिकल स्टोअर्सचे संजय जाधव यांनी जिल्हा अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

 दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक बिनविरोध करण्याची मागणी!
जिल्ह्यात सध्या भीषण दुष्काळी परिस्थिती असून औषध व्यवसायावरही त्याचा परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत निवडणुकीचा खर्च आणि धावपळ नको, अशी भूमिका अनेक सामान्य केमिस्ट व्यावसायिकांकडून व्यक्त होत आहे. सत्ताधारी आणि विरोधी गटांनी एकत्र बसून निवडणूक बिनविरोध करावी, अशी मागणी होत आहे. सामान्य केमिस्टनी निवडणुकीकडे पाठ फिरविल्याचीही चर्चा आहे. या मागणीला सत्ताधारी गट कितपत प्रतिसाद देतो आणि उर्वरित जागांसाठी प्रत्यक्ष निवडणूक होते की सर्वमान्य तोडगा निघतो, याची उत्सुकता आहे.

Recent News

 
Top