अभंग, भक्तिगीतांच्या सुरांनी मुुरुममध्ये रंगली ‘दीपसंध्या’!
गायक सौरभ नाईक यांच्या सुमधुर गायनाने रसिक मंत्रमुग्ध; तबला, हार्मोनियम अन् पखवाजाच्या साथीने मैफिलीला रंगत

मुुरुम, दि. ११ नोव्हेंबर :
दीपावली पाडव्याच्या मंगलमय पर्वावर अभंग, भक्तिगीते आणि भावगीतांच्या सुरेल स्वरांनी मुुरुमकरांची संध्याकाळ अविस्मरणीय ठरली. रोटरी क्लब मुुरुम सिटीच्या वतीने प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयात आयोजित ‘दीपसंध्या’ या विशेष सांस्कृतिक संगीत मैफिलीला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
 प्रसिद्ध गायक सौरभ नाईक यांच्या सुमधुर गायनाने उपस्थित श्रोते अक्षरशः मंत्रमुग्ध झाले.
प्रारंभी गायक सौरभ नाईक, रोटरीचे अध्यक्ष कल्लय्या स्वामी, सचिव प्रकाश रोडगे, ब्रह्मकुमारीचे राजु भालकाटे,  प्रा. डॉ. महेश मोटे, मीरा मोटे, त्र्यंबक व्हटकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. प्रा. डॉ. महेश मोटे आणि त्र्यंबक व्हटकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या संगीत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

गायक सौरभ नाईक यांनी ‘वंदीन अयोध्येचा राजा’, ‘अबीर गुलाल उधळीत रंग’, ‘भाग्यदा लक्ष्मी बारम्मा’, ‘माझे माहेर पंढरी’, ‘प्रथम तुज पाहता’, ‘घेई छंद मकरंद’, ‘हे सुरांनो चंद्र व्हा’, ‘बाजे मुरलिया बाजे’ आणि ‘अगा वैकुंठीचा राया’ अशा एकापेक्षा एक सरस रचना सादर करून मैफिलीला भक्तिरस आणि स्वर वैभवाची उंची प्राप्त करून दिली.

या मैफिलीला प्रशांत गाजरे (तबला), विनायक चौधरी (हार्मोनियम), विश्वेश्वर जोशी (पखवाज) आणि श्रीकर लालवंडीकर (टाळ) यांनी बहारदार वाद्यसंगत केली. सुनील राठोड, मनश्री मोटे आणि अनुष्का कबाडे यांनीही गीत सादर करून रसिकांची दाद मिळवली.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. नितीन डागा, प्रा. डॉ. सुधीर पंचगल्ले, मल्लिकार्जुन बदोले, कल्लाप्पा पाटील, डॉ. राजकुमार हिरेमठ, राजकुमार वाकडे, अॅड. उदय वैद्य, प्रा. राजकुमार नाईक, रतन पाटील आणि दिलीप हंगरगे यांनी पुढाकार घेतला. सूत्रसंचालन संतोष कांबळे यांनी केले, तर सुनील राठोड यांनी आभार मानले.

Recent News

 
Top