शहापूरच्या ग्रामविकासाचा उद्या रंगणार ‘विकासमंत्र’!
आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील यांचे आज मार्गदर्शन; २४ तास शुद्ध पाणीपुरवठा, स्वच्छ व हरित गावाच्या संकल्पनांवर मांडणार विचार

नळदुर्ग, दि. ११ नोव्हेंबर : 

गावाचा विकास म्हणजे केवळ रस्ते, गटारे आणि इमारती नव्हे, तर प्रत्येक कुटुंबाला मूलभूत सुविधा देत गावाचा चेहरामोहरा बदलणे होय. याच विकासदृष्टीचा प्रेरणादायी मंत्र देण्यासाठी महाराष्ट्रातील आदर्श सरपंच म्हणून परिचित असलेले भास्कर पेरे पाटील गुरुवारी (दि. १२) शहापूर (ता. तुळजापूर) येथे ग्रामस्थांशी संवाद साधणार आहेत.

बाबू जाधव व समस्त ग्रामस्थांच्या पुढाकारातून आयोजित या मार्गदर्शन कार्यक्रमात स्वच्छ, सुंदर, समृद्ध आणि हरित गावाच्या निर्मितीचा आराखडा मांडला जाणार आहे. विशेषतः प्रत्येक घराला चोवीस तास शुद्ध पाणीपुरवठा, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, सांडपाण्याचे नियोजन, वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धन या विषयांवर पेरे पाटील आपल्या अनुभवातून मार्गदर्शन करणार आहेत.

लोकसहभाग हाच ग्रामविकासाचा खरा पाया!
गावाचा कायापालट करण्यासाठी केवळ शासनाच्या योजनांवर अवलंबून न राहता ग्रामस्थांची एकजूट, लोकसहभाग आणि पारदर्शक कारभार आवश्यक आहे. महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि शेतकऱ्यांना विकासप्रक्रियेत सहभागी करून घेतल्यास आदर्श गावाची निर्मिती शक्य आहे. उपलब्ध साधनसंपत्तीचा योग्य वापर, विकासकामांचे नियोजन आणि नागरिकांची सामूहिक जबाबदारी यावरही या वेळी प्रकाश टाकला जाणार आहे.
शहापूरच्या विकासाला नवी दिशा देणारा हा कार्यक्रम केवळ मार्गदर्शनापुरता मर्यादित न राहता गावाच्या उज्ज्वल भविष्यासाठी सामूहिक संकल्प ठरावा, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे.

कार्यक्रम गुरुवारी रात्री ७ वाजता पंचकट्टा, शहापूर येथे होणार असून परिसरातील ग्रामस्थ, महिला, युवक, शेतकरी व सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन बाबू जाधव व समस्त ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

Recent News

 
Top