उस्मा नाबाद जिल्हीयातील मोबाईल टावर हलविण्याची मागणी
तुळजापूर – जिल्हयातील बहुतांश गावात भर नागरी वस्तीमध्ये एकाच ठिकाणी अनेक मोबाईल टावर (मनोरा) उभे असून मोबाईलसाठी आवश्यक असणा-या टावरमधुन इलेक्ट्रो-मॅग्नेटिका रेडिएशन (किरणोत्सर्ग) मोठयाप्रमाणावर बाहेर पडत असल्याने पशुपक्ष्यासह मानवाच्या आरोग्यासाठी घातक ठरत असल्याचे उघडकीस येत आहे.
भारत संचार निगम (बीएसएनल) या एकटया कंपनीचे उस्मानाबाद जिल्हयात 150 टावर उभे असून अनेक विविध खासगी कंपनीचे शेकडो टावर आज घडीला शहरी व ग्रामीण भागात उभे आहेत. टावरमधुन निघणा-या रेडिएशनमुळे मानवास गंभीर आजार बळावत असल्याची शक्यता तज्ञाकडून वर्तविली जात आहे. ते टावर तात्काळ इतरत्र हलवावे, अन्यथा जनतेतून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला जात आहे.
मोबाईल सेवा उच्च वर्गीयापासून आज सर्वञ ग्रामीण भागातील सर्वसामान्यापर्यंत पोहचली आहे. मोबाईलवरून विना अडथळा सुसंवाद साधण्यासाठी व स्पर्धेमध्ये अव्वल येण्यासाठी मोबार्इल कंपन्याची गावागावात व शहरात मोठयाप्रमाणावर मिळेल त्या जागी सर्वञ मोबाईल टावर ‘गुढी’ सारखे उभारले. त्यास उस्मानाबाद जिल्हाही अपवाद नाही. जिल्हयातील नळदुर्ग शहरात सहापेक्षा अधिक मोबाईल टावर आहेत. त्यापैकी बसस्थानकाच्या पाठीमागे तीन वेगवेगळया कंपनीचे मोबाईल टावर गेल्या काही वर्षापासून उभे आहे. एकाच ठिकाणी दोन ते तीन टावर उभे करण्यासाठी संबंधित खात्याच्या अधिका-यानी कशी काय परवानगी दिली. याप्रकरणी चौकशी होणे गरजेचे आहे. एका बीएसएनच्या अधिकृत टावरमधील ऑप्टीकल फायबर केबल मधुन प्रति एका सेकंदाला 80 लाख लोकाचा एकमेकांशी संवाद होत असून अशा फायबर केबलची संख्या 24 असल्याचे समजते. माञ प्रत्यक्षात चार ते पाच फायबर केबल कार्यान्वित असून याप्रमाणे त्याचा गणित केल्यास एका सेकंदाला जवळपास चार कोटी लोक संवाद करीत असल्याची माहिती उघडकीस आली आहे. त्यावरुन टावरमधुन किती प्रमाणात रेडिएशन बाहेर पडतो याची कल्पना न केलेलीच बरी.
तंञज्ञानाबाबत ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनता अज्ञानी आहे. त्यांना वस्तू वापरायच्या प्राथमिक गोष्टी माहित आहेत, परंतु का, कशा, केव्हा, कुठे वापरायच्या आणि वापराचे तोटे याविषयीची माहिती त्यांना म्हणावी तितकी नाही. शहर व जिल्हयात लोकवस्तीत उभे असलेले अनेक मोबाईल टावर आरोग्यास घातक असून हे टावर हलविण्यात यावे, शहरात उभारण्यात आलेले मोबाईल टावर जनतेच्या आरोग्यास हानीकारक आहेत. ग्रामीण भागातही असे टॉवर उभारण्यात आलेले आहेत. हे टावर गावाबाहेर, शहराबाहेर हलवावेत तसेच अनधिकृत टावरवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. सर्वसामान्य नागरिकांना माञ मोबाईल टॉवर किंवा मोबाईलमधून होणारे रेडिएशन नेमके किती प्रमाणात आहे, ते आरोग्याला किती आणि कशा पध्दतीने घातक आहे, याबद्दलची कसलीच माहिती त्यांना नाही. मोबाईल कंपन्या आपल्या ग्राहकांच्या जीवनाशी खेळत आहेत. शासन त्यांच्यावर कडक निर्बंध घालणे गरजेचे असताना त्यांना अप्रत्यक्षरित्या साथ देत असल्याची ही चिंताजनक बाब पर्यावरणप्रेमी नागरिकांतून व्यक्त केली जात आहे.
शासनाने मोबाईल वापरण्याबाबतचे धोरण नुकतेच लागू केले आहे. त्यानुसार मोबाईलधारकाने कमीत कमी बोलावे, बोलताना कानापासून फोन दूर ठेवावे, त्याचबरोबर स्पीकरचा उपयोग करावा, रेंज मिळत नसल्यास मोबाईल सर्व शक्तीनिशी कार्यरत होतो, त्याचा दुष्परिणाम होत असल्याने शक्यतो बोलणे टाळावे, शक्य असल्यास बोलण्यापेक्षा एसएमसचा अधिक वापर करावे, बोलताना कानावर मोबाईलचा दाब पाडू नये, त्याचबरोबर बाईकवर असताना मोबाईल वापरू नये, हेलमेट डोक्यावर असताना किंवा ओले केस असताना बोलणे टाळावे, मोबाईलऐवजी लॅण्डलाईनचा वापर करावा, कृञिम अवयव प्रत्यारोपण झालेल्या रूग्णांनी मोबाईल दूर ठेवावे, लहान मुलांपासून मोबाईल दूर ठेवावे, या व इतर सूचना केंद्र सरकारने केल्या आहेत. मोबाईल टॉवरमधून निघणा-या किरणोत्सर्गाच्याबाबतीत आणि मोबाईल टावर उभारण्यासाठीही नव्याने निर्देश दिले आहेत. या नव्या निर्देशानुसार मोबाईल कंपन्यांवरही काही बंधन घालण्यात आली आहेत.
Labels: जिल्हा


<< Home