Tuesday, 23 September 2014

विद्यापीठाचा अकरावा युवा महोत्सव जल्लोषात प्रारंभ

    बार्शी - शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या शिवाजी महाविद्यालयास यावर्षी सोलापूर विद्यापीठाच्या उन्मेश सृजनरंगाचा या युवा महोत्सवाचे यजमानपद मिळाले आहे. या महोत्सवास बार्शीत जल्लोषात प्रारंभ झाला आहे.   
    या महोत्सवाचे उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.एन.एन.मालदार यांच्या अध्यक्षतेखाली, महावितरणचे मुख्य अभियंता डॉ.मुरहरि केळे, उपविभागीय पोलिस अधिक्षक सर्जेराव ठोंबरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संस्थेच्या आवारातील शाहीर अमर शेख मुख्य रंगमंचात करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्ष रमेश पाटील, संस्थाध्यक्ष डॉ.बी.वाय यादव, विद्‌यार्थी कल्याण विभागाचे संचालक प्रशांत नलावडे, प्राचार्य मधुकर फरताडे, प्राचार्य शिवपुत्र धुत्तरगाव, विद्यापीठाचे कुलसचिव एस.के.माळी आदी उपस्थित होते.
    याप्रसंगी कुलगुरु डॉ.मालदार म्हणाले, शिवाजी महाविद्यालयाला यंदाचे अकरावे युवा महोत्सवाचे यजमानपद देतांना या महाविद्यालयाची मागील दहा वर्षांतील चांगली कामगीरी, दहा पैकी सात वेळेस युवा महोत्सवाचे प्रथम क्रमांकाचे विजेतेपद, एक वेळेस उपविजेतेपद यासह महाविद्यालयाचा चांगला दर्जा टिकविला असल्याने हे यजमानपद देण्यात आले आहे. निवडणूका व दिवाळी यांचा विचार करतांना विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या १७ ऑक्टोबर रोजी होणार्‍या परीक्षांच्या तारखांमध्ये बदल करुन २८ ऑक्टोबरमध्ये घेण्यात येणार आहेत.
    कार्यक्रमाच्या सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराज, कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे यांच्या प्रतिमापूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी निवडणूकांमध्ये युवक मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावण्याची व राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्याची शपथ देण्यात आली. पसायदानाने उद्घाटन सोहळ्याची सांगता करण्यात आली.

Labels: