उस्मानाबाद :- प्रतिवर्षाप्रमाणे दिपावली सणानिमित्त तात्पुरते फटाके विक्रीसाठी परवाना असणे आवश्यक आहे. फटाके विक्रीसाठी स्टॉल परवानगीसाठीचे अर्ज 9 नोंव्हेंबर, 2012 पर्यंत्जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद येथे सादर करावेत, असे आवाहन जिल्हादंडाधिकारी, उस्मानाबाद यांनी केले आहे.
फटाके विक्री स्टॉल परवानगीसाठी विहीत नमुन्यात अर्ज, फॉर्म एई-5 संबंधित ग्रामपंचायत, नगरपरिषदेचे नाहरकत प्रमाणपत्र व साक्षांकित नकाशा, संबंधित जागा खाजगी असेल तर जागा मालकांचे ना हरकत, संबंधित पोलीस स्टेशनचे ना हरकत व जागेचे कागदपत्र, प्रमाणपत्र व विहीत परवाना शुल्क भरणा केल्याचे चलन सादर करावेत. परवाना मंजूरीसाठी परिपुर्ण प्रस्ताव स्वीकारण्यात येतील. विहीत दिनांकानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची फटाके विक्रेत्यांनी नोंद घ्यावी.
उस्मानाबाद :- देशाचे पहिले गृहमंत्री कै. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीदिनापासून दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार असून त्यानिमित्त 29 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात जनजागृती सप्ताहानिमित्त सचोटी, पारदर्शक काम आणि मूल्याधिष्ठित सेवा पुरविण्यासाठी कटिबद्ध राहण्याची प्रतिज्ञा विविध कार्यालयात घेतली जाणार असल्याचे लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधिक्षक एस. आर. भांडवले यांनी कळविले आहे.

