तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलांचे उदघाटन मुख्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते झाले. त्यावेळी हा शेतकरी मेळावा झाला. यामेळाव्यात त्यांनी ही ग्वाही दिली. अध्यक्षस्थानी राज्याचे कृषी व पणन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील होते. यावेळी पशू संवर्धन व दुग्धविकास मंत्री तथा उस्मानाबादचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, सार्वजनिक आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी, खासदार डाँ. पद्मसिंह पाटील यांच्यासह आमदार सर्वश्री बसवराज पाटील, वैजनाथ शिंदे, राणाजगजीतसिंह पाटील, राज्य परिवहन महा मंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे यांच्यासह तुळजापूरच्या नगराध्यक्षा सौ. अर्चनाताई गंगणे, तुळजापूर प्राधीकरणाचे सदस्य नरेंद्र बोरगावकर, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
तुळजापूर बाजार समितीच्यावतीने उभारण्यात आलेल्या व्यापारी संकुलाचे कै.विलासराव देशमुख व्यापारी संकुल असे नामकरण करण्यात आले आहे. उद्घाटनानंतर मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, स्वतःच्या हिमतीवर आणि कोणतेही कर्ज न घेता तुळजापूर बाजारसमितीने हे 65 गाळ्यांचे हे व्यापारी संकुल उभारण्यात आले आहे. त्याचे यथोचित असे विलासराव देशमुख असे नामकरण करण्यात आले आहे, हा कै. देशमुख यांची स्मृती जपण्याचा प्रय़त्नही चांगला आहे.
मुख्यमंत्री चव्हाण यांनी टंचाईचा आढावा घेताना उस्मानाबाद जिल्ह्यातील परिस्थितीचा उहापोहही केला. ते म्हणाले, जिल्हयातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी सर्व ते प्रयत्न करण्यात येतील. मराठवाड्याला कृष्णा खोऱ्यातील पाणी उपलब्ध करून दिले पाहीजे, ही शासनाची भुमिका आहे. प्राप्त परिस्थितीत ज्या प्रकल्पांचे काम पुर्णत्त्वाकडे जात आहे, त्यांना प्राधान्याने निधी देणे योग्य ठरेल.
पाण्याचा वापर आता जपून करण्याची गरज आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी शास्त्रीय दृष्टीकोन बाळगावा लागेल. पाण्याचा ठिबक सिंचनासारख्या तंत्राद्वारे काटेकोर आणि काटसरीने वापर करावा. जलसिंचनासाठीची उपाय योजना पिण्याच्या पाण्यासाठी वापरण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे, याचा विचार करून, पाणी वापराचे व्यवस्थापन करावे लागेल.
शेती मालाच्या दराबाबत मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, उडीद, मुग आणि सोयाबीन यांच्या खरेदीसाठी नाफेडची खरेदी केंद्र राज्यात सुरु व्हावीत यासाठी केंद्र शासनाकडे प्रयत्न सुरु आहे. शेतकऱ्यांचा शेतमाल बाजारात येताच, त्याचे दर कोसळू नयेत व शेतमालाचा योग्य रितीने उठाव व्हावा. त्यामध्ये शेतकऱ्यांची कुठल्याही पद्धतीने अडचण होऊ नये यासाठी नाफेडकडे पाठपुरावा करून, जास्तीत जास्त खरेदी केंद्र सुरू करण्याचा प्रयत्न राहील.
अध्यक्षीय भाषणात कृषी व पणन मंत्री विखे-पाटील म्हणाले, बाजार समित्यांना कोल्ड स्टोरेज, गोडावून्स, भारतीय वखार महामंडळाच्या माध्यमातून वायदे बाजार अशा बाबींद्वारे टप्प्या-टप्प्याने अद्ययावत करण्याचा प्रयत्न सुरु आहे. वायदे बाजारांचा शेतकऱ्यांना फायदा होईल, असे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी कृषि व पणन मंत्रालय एकत्र करण्याचा प्रयोग केला. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन आणि त्यांचे पणन यात समन्वय साधता येऊ लागला आहे. सरकारची प्राथमिकता शेतकरी हीच आहे. यावेळी श्री. विखे-पाटील यांनी उस्मानाबाद जिल्ह्मातील पशुधनाच्या हितासाठी नऊ हजार हेक्टरवर चारा निर्मिती केली जाईल. त्यासाठी शंभर टक्के अनुदानाद्वारे मका व ज्वारीचे बियाणे उपलब्ध करून दिले जाईल, असेही सांगितले.
यावेळी पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री मधुकरराव चव्हाण, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांची समयोजित भाषणे झाली. मेळाव्यात माजी आमदार शिवाजीराव बाभळगावकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तुळजापूर बाजार समितीचे सभापती सचिन पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. व्यासपीठावर कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक आदी उपस्थित होते. मेळाव्याला परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते
