उस्मानाबाद -: जिल्ह्यातील जवळपास साडे चारशे गावांची हंगामी पैसेवारी जाहीर झाली असून शासनाच्या निर्णयामुळे ४३८ गावाना लाभ मिळणार आहे. दुष्काळ निवारण कार्यक्रमांतर्गत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने हेल्पलाईन सुरू करण्यात आली असून नागरीकांनी ८८८८६२७७७७ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील ४४४ गवांची हंगामी पैसेवारी जाहीर करण्यात आली असून त्यापैकी ४३८ गावांची पैसेवारी ५0 पैशांपेक्षा कमी आहे. यामुळे संबंधित गावांमध्ये आता टंचाई निवारणार्थ उपाययोजना राबविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यात उस्मानाबाद तालुक्यातील ५९, तुळजापूर ११७, उमरगा ८0, लोहारा ३७, कळंब ९७, भूम ६ आणि वाशी तालुक्यातील ४२ गावांचा समावेश आहे. सध्याची पाणीटंचाईलक्षात घेता संबंधित गावांमध्ये सदरील पैसेवारीच्या अनुषंगाने टंचाई परिस्थितीत लागू असलेल्या उपाययोजना कार्यान्वित करण्यात येणार आहेत. यामध्ये टँकर, बैलगाडीने पाणीपुरवठा करणे, तात्पुरती नळयोजना राबविणे आदी उपाययोजनांचा समावेश आहे.
तसेच महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कामे सुरू करावीत व रोजगारापासून कोणतीही व्यक्ती वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. गरजेनुसार मंडळस्तरावर किंवा गरज भासल्यास गावस्तरावरदेखील गुरांच्या छावण्या उघडण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, याबाबत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी प्रसिद्धीपत्रक काढले असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागणीला यश आल्याचे नमूद केले आहे. हा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लावून धरला होता. तसेच गावोगावी जावून लोकांमध्ये जनजागृतीदेखील केली होती, असे त्यात म्हटले आहे.