उस्मानाबाद: जिल्ह्यातील अल्पसंख्याक  समाजाच्या विकासासाठी पंतप्रधानांच्या १५ कलमी कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न उस्मानाबाद जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून सुरु आहे. 
           अल्पसंख्याक समाजासाठी शिक्षणाच्या संधीत वाढ करणे, त्यांना रोजगाराभिमुख प्रशिक्षणाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविणे, त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न आणि सामाजिक सलोखा टिकवून ठेवणे यासाठी प्रशासनामार्फत विशेष प्रयत्न जिल्हाधिकारी डॉ. के. एम. नागरगोजे यांच्या नेतृत्वाखाली होत आहेत.
         सध्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत इंदिरा आवास योजनेअंतर्गत ९१ घरकुलांची कामे सुरु असून एकूण ४३८ घरकुलांचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मागील वर्षी अल्पसंख्याक बहुल शाळांना पायाभूत सुविधेसाठी ६६ लाख ६८ हजार इतके अनुदान वाटप करण्यात आले. यावर्षीही या पायाभूत सुविधांसाठी अनुदान मिळण्याबाबतचे प्रस्ताव विविध संस्थांकडून मागविण्यात आले.
         नागरी क्षेत्रातील अल्पसंख्याक बहुल क्षेत्राच्या विकासासाठी उस्मानाबाद, उमरगा, मुरुम,कळंब, भूम आणि परंडा या नगरपालिकांवा प्रत्येकी दहा लाख रुपयांचा  निधी देण्यात आला. 
          जिल्ह्यात जातीय सलोखा कायम राहावा, यासाठी पोलीस मित्र समितीच्या २०१ तर शांतता समितीच्या ५४२ बैठका घेऊन प्रयत्न करण्यात आला. जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था कायम राहाण्यासाठी हे पाऊल उपयुक्त ठरले. अल्पसंख्याक समाजातील होतकरु उमेदवारांसाठी पोलीस शिपाई भरतीपूर्व परीक्षा प्रशिक्षण योजनेंतर्गत १७८ जणांना प्रशिक्षण देण्यात आले. या समाजातील उमेदवार तरुणांसाठी मराठी भाषा फौंडेशन वर्ग चालविण्यात येत आहेत.
         जिल्हा  अल्पसंख्याक विकास संनियंत्रण समितीमार्फत  अल्पसंख्याक विकासाचा दिशादर्शक कार्यक्रम राबविला जात आहे.
 
Top