उस्मानाबाद :- जिल्ह्यातील पाणीसाठे केवळ पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित करण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनाने उपलब्ध पाण्याचे विविध विभागांच्या साह्याने आगामी काळातील पाणीवापर आणि पाणीवाटपाचे नियोजन करावे, अशी सूचना पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी केली.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज पाणी आरक्षणासंदर्भात पालकमंत्री चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी जिल्ह्यातील विविध सिंचन प्रकल्पातील उपलब्ध पाणीसाठा तसेच त्याचे पाणीवाटपाबाबतचे नियोजन याबाबत विचारविनीमय करण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ.के.एम.नागरगोजे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एल. हरिदास, अतिरिक्त जिल्हाधिकारी ज्ञानोबा फुलारी, महावितरणचे अधीक्षक अभियंता के. जी.राठोड, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता श्री. भालेराव, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता नेताजी गोरे आदिंची यावेळी उपस्थित होती. आठही तालुक्यांचे तहसीलदार तसेच गटविकास अधिकारी यांनाही याबैठकीसाठी बोलाविण्यात आले होते.
पालकमंत्री चव्हाण यांनी तालुकावार तेथील सिंचन प्रकल्पातील पाणी उपलब्धता आणि त्याचे आगामी काळातील नियोजन याचा आढावा घेतला. आगामी काळातील जलसंकटाचा मुकाबला करण्यासाठी उपलब्ध स्त्रेातामधून मिळणाऱ्या पाण्याचा काटेकोरपणे आणि नियोजनबध्दरितीने वापर करण्याबाबत जागृती होणे गरजेचे आहे त्यादृष्टीने संबंधित तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांनी काम करावे,अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
भूम आणि वाशी तालुक्यासाठी अरसोली तलावातून पाणी उपलब्ध असल्याचे यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र सर्वांनी पाणी वापराबाबत काळजी घ्यावी. विविध भागांना भेटी देवून तेथील पाणी टंचाई प्रश्नांबाबत तातडीने मार्ग काढण्याबाबत कार्यवाही करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.सध्या कोरडे पडलेल्या सिंचन प्रकल्पाच्या आसपास विंधनविहीरी घेता येतील का याचाही विचार व्हावा आणि संबधित यंत्रणेने त्यादृष्टीने कार्यवाही करावी. प्रत्येक गावाचा संबंधित तहसीलदार,गटविकास अधिकारी, पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांनी संयुक्तपणे आपत्कालीन आराखडा तयार करावा,असेही श्री. चव्हाण यांनी सांगितले.
कळंब तालुक्यात सध्या २८ फेब्रुवारीपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे त्यामुळे त्याठिकाणी इतर ठिकाणचे पाणीस्त्रोत शाधावेत. ग्रामीण भागातही डिसेंबरनंतर पाणी प्रश्न जाणवू शकतो. त्यामुळे लातूर जिल्ह्यातून कळंबसाठी पाणी घेण्याबाबत संबधितांशी विचारविनिमय करावा,असेही त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी वाशी,उमरगा,तुळजापूर, उस्मानाबाद,लोहारा तालुक्यतील पाण्याबाबतचा आढावा घेतला. बंद पडलेल्या विंधनविहीरी पुन्हा सुरु करण्याबाबत तसेच कोरड्या प्रकल्पात विंधनविहीर अथवा विहीरी घेवून पाणी उपलब्ध होवू शकेल का याचाही विचार करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी डॉ.नागरगोजे यांनी जिल्ह्यातील पाण्याबाबतची सदयस्थिती मांडली. गेल्या दोन दिवसात आठही तालुक्यांना भेटी देवून पाणी प्रश्नांबाबतची गंभीरता संबंधितांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला असल्याचे त्यांनी सांगितले.