उस्मानाबाद -: भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी पाझर तलाव व साठवण तलावाची गळती थांबविली पाहिजे. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सक्षम करण्यासाठी सुक्ष्म ठिंबक सिंचनाद्वारे शेती या मोहिमेच्या माध्यमातून पाणलोट विकासाची जनजागृती करावी, असे आवाहन पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी केले.
    कै.यशवंतराव चव्हाण सभागृह, जि.प. उस्मानाबाद येथे आयोजित डॉ.बाबासाहेब आंबेडकर  एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम जनजागृती अभियान उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, जि.प.चे अर्थ व बांधकाम सभापती धनंजय सांवत,  कृषी व पशुसवंर्धन सभापती पंडीत जोकार, समाज कल्याण सभापती दगडू धावारे, पंचायत समिती सभापती  सौ. प्रेमलता लोखंडे, जिल्हाधिकारी डॉ.के.एम.नागरगोजे, मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एल.हरिदास, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांची उपस्थिती होती. 
     पालकमंत्री चव्हाण म्हणाले की, गाव हा विकासाचा घटक केंद्रबिंदू मानून गाव पातळीवरील विकासाची कामे लोकप्रतिनिधी व गावातील सर्व समाजाला विश्वासात  घेऊन सहकार्यातून तात्काळ मार्गी लावावीत. प्रत्येक योजना गावात यशस्वी होण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी सहकार्य करावे. गावाच विकास म्हणजे तालुका व जिल्ह्याचा विकास होय असे सांगून ते पुढे म्हणाले की, हे एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम जनजागृती अभियान यशस्वी करण्यासाठी गावागावात ग्रामसभा, ग्रामसंवाद, कार्यशाळा, पत्रके काढून जनजागती करावी, अशी सूचना त्यांनी यावेळी दिली.
    यावेळी पालकमंत्री चव्हाण यांनी सांगितले की, नागरिकांकडून सांडपाण्याचा वापर झाडे जगविण्यासाठी करणे, प्रत्येक गावाने वीज गळती थांबविणे व नियमित बिले भरण्यासाठी प्रवृत्त करणे आवश्यक असल्याचे सांगून शासन या योजनेसाठी अनुदान देते त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा,असेही त्यांनी सांगितले.
    जिल्हाधिकारी डॉ. नागरगोजे म्हणाले की, टँकरने पाणी आणून विहिरीत सोडण्याऐवजी सिनटॅक्समध्ये पाणी भरुन त्याचा तोटीच्या साहयाने पाण्याचा उपयोग करावा. ज्या ज्या गावात  जनावरे व लोकांसाठी पिण्याचे पाणी नाही त्या ठिकाणी उपलब्ध करुन द्यावे. पाणी पातळी खोलवर असेल आणि त्या कामासाठी तरतूद उपलब्ध नसेल तर जिल्हा वार्षीक योजनेतून मागणीप्रमाणे ती देण्यात येईल.  पाण्याचा स्त्रोत वाढवून  पाण्याची बचत होण्यासाठी प्रयत्न करा, अशी सूचना केली. 
        कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात शंकर तोटावार यांनी या पाणलोट अभियान राबविण्याची संकल्पना विशद केली. ग्रामविकास, जलसंधारण विभाग व कृषी विभाग यांचे संयुक्त विद्यमाने दि.26 नोव्हेंबर,2012 पासून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनापर्यंत (6 डिसेंबर,2012) या कालावधीत होत आहे. एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमात उस्मानाबाद जिल्ह्यासाठी 38 प्रकल्प मंजूर झाले असून त्यामध्ये 220 गावांचा समावेश आहे. यासाठी 20652 लाख एकूण प्रकल्प मुल्य आहे. मंजूर प्रकल्प 5 ते 6 वर्षाच्या कालावधीत पूर्ण करावयाचे आहेत. एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लोकसहभागाची गरज आहे. या योजनेत केंद्राकडून 90 तर राज्याकडून 10 टक्के निधी उपलब्ध करुन दिला जातो, अशी माहिती त्यांनी दिली. 
             उपविभागीय अधिकारी श्री.जाधवर यांनी पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमाची सादरीकरणाद्वारे माहिती दिली. मोहिम अधिकारी जि.प. डॉ. चिमनशेटे यांनी सूत्रसंचालन केले तर पाणलोट विकास यंत्रणेचे  थोरमोटे आभार यांनी मानले. 

 
Top