उस्मानाबाद -: केंद्र शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पत्र सूचना कार्यालय आणि क्षेत्रीय प्रचार निदेशालयाच्या वतीने तुळजापूर येथे 27 ते 29 नोव्हेंबर या कालावधीत भारत निर्माण लोकमाहिती अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. तुळजापूर येथील नवीन बसस्टँड येथे हा कार्यक्रम होणार असून त्याचे उदघाटन पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते तसेच खासदार डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या अध्यक्षतेखाली   सकाळी 10-30 वाजता होणार आहे.
      शासनाच्या कल्याणकारी योजनांचा ग्रामीण भागात प्रचार करणे तसेच योजनांची अंमलबजावणी करणारी कार्यालये आणि लाभार्थी यांच्या दरम्यान समन्वय साधून शासनाच्या विकासाभिमूख कार्यक्रम यशस्वी करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. माहिती प्रदर्शन, परिसंवाद, आणि ग्राम पातळीवर जनजागरण असे त्रिस्तरीय भारत निर्माण लोकमाहिती अभियान  या कार्यक्रमाचे स्वरुप आहे. माहिती प्रदर्शनात केंद्र सरकार तसेच राज्य सरकारचे विविध विभाग, सार्वजनिक उपक्रम, महामंडळे, स्वयंसेवी संस्था आदि सहभागी होणार आहेत. जवळपास 40 माहिती स्टॉल्स या प्रदर्शनात लावण्यात येणार आहेत. परिसंवादामध्ये मानव विकास, कृषी विकास, माहितीचा अधिकार कायदा, माहिती सबलीकरण, महिलांचे आरोग्य व कुटूंब कल्याण, गुणवत्तापूर्ण शिक्षण, राष्ट्रीय रोजगार हमी योजना, पाण्याचे महत्व आणि प्रदूषण आदि विषयावर नामवंत वक्ते मार्गदर्शन करणार आहेत. 
     या कार्यक्रमास गोदावरी खोरे पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आमदार राहूल मोटे, राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे, आमदार राणा जगजितसिंह पाटील, आमदार ओमराजे निंबाळकर, आमदार ज्ञानराज चौगुले, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ.के.एम.नागरगोजे, मुख्यकार्यकारी अधिकारी एस.एल.हरिदास, पोलीस अधिक्षक सचिन पाटील तसेच जिल्ह्यातील विविध लोकप्रतिनिधी, पदाधिकारी या कार्यक्रमास उपस्थित राहणार असल्याची माहिती पत्रसूचना कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे.  
      लोकमाहिती अभियानाच्या उदघाटनाच्या दिवशी सकाळी 8 वाजता तुळजापूरातील शिवाजी चौक येथून विद्यार्थ्यांची जनजागरण रैली काढण्यात येणार आहे. उदघाटन सत्रानंतर सरपंच व ग्रामसेवक मेळावा, दि.28 रोजी या अभियानातंर्गत महिला व बचतगट मेळावा आयोजित करण्यात आला असून त्याचे उदघाटन पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या मेळाव्यात महिला आरोग्य व बाल विकास, स्त्रीभ्रूण हत्या या विषयांवर मार्गदर्शनपर व्याख्याने होणार आहेत.   दि.29 रोजी या ठिकाणी युवक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी माहितीचा अधिकार कायद्यातील नवीन बदल या विषयावर मार्गदर्शन होणार आहे.
 
Top