महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या पावन भूमीत असलेल्या तुळजापूर विधानसभा मतदार संघावर फडकावा, अशी हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती. मात्र त्यांची ही इच्छा अखेरपर्यंत पूर्ण झाली नाही, त्याची खंत त्यांच्या मनाला होती. याबाबत नागरिकात चर्चा होत आहे.
छत्रपती शिवाजी महाराजाना श्री तुळजाभवानी मातेने भवानी तलवार देऊन आशीर्वाद दिल्याचा इतिहास असून शिवसेनेच्या प्रारंभीच्या काळात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी श्री तुळजाभवानी मातेस व हिंदवी स्वराजाचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना आपले प्रेरणास्थान मानले. त्यामुळे शिवसेनेच्या कार्यक्रमाची सुरुवात 'जय भवानी, जय शिवाजी' या जयघोषाने होत असल्याचे सर्वश्रूत आहे. तुळजाभवानी मातेवर त्यांची मोठी श्रद्धा होती. त्यांना शिवसैनिकांकडून दरवर्षी तुळजाभवानी मातेचा महाप्रसाद पाठविला जायचा. कोणत्याही निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ भवानी मातेचे कृपा आशीर्वाद घेऊनच केला जातो. तुळजापुरात अठरा वर्षापूर्वी शिवसेनेचे पहिले महिला अधिवेशन घेण्यात आले होते. या अधिवेशनासाठी मीनाताई आणि बाळासाहेब ठाकरे दोन दिवस तुळजापुरात उपस्थित होते. त्यांनी दोन्ही दिवस जिल्हा महिला आघाडी संघटक शामल वडणे यांच्या घरचे जेवण घेतले. त्यानंतर दुसर्याच वर्षी म्हणजे 1995 साली महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीची सत्ता आली. यावेळी धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील पाचपैकी तीन विधानसभेच्या जागेवर शिवसेनेने आपला भगवा फडकविला होता. मात्र तुळजापूर विधानसभा मतदार संघावर शिवसेनेला आपला भगवा फडकविता आला नाही. तुळजाभवानी मातेच्या आशीर्वादानेच महाराष्ट्र राज्यात युतीची सत्ता आली. यापुढे तुळजापूर विधानसभेवर भगवा फडकवा, असे आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केले होते. त्यानंतर तुळजापूर विधानसभेच्या जागेसाठी अनेक प्रयत्न झाले. गेल्या निवडणुकीत मात्र तुळजाभवानी विधानसभा मतदार संघाची जागा शिवसेनेऐवजी भाजपाला सुटली. मात्र युतीचे उमेदवार सुभाष देशमुख यांचा निसटता पराभव झाला. तुळजापूरची जागा आपण जिंकू शकलो नाही, ही खंत बाळासाहेबांच्या मनात अखेरपर्यंत घर करून राहिली.
शिवसेनेच्या ज्या घोषणेमध्ये सर्वप्रथम जय भवानी असा उल्लेख होतो, त्या भवानी मातेच्या तुळजापुरात शिवसेनेचा भगवा फडकावा, अशी बाळासाहेबांची मनोमन असलेली इच्छा अखेर अपूर्ण राहिली. प्रयत्न करूनही तुळजापूरची जागा जिंकता न आल्याची खंत बाळासाहेबांनी अनेकदा बोलून दाखविली.