उस्मानाबाद -: जिल्हयात राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान आणि जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागच्यावतीने जननी शिशू सुरक्षा कार्यक्रम राबविण्यात येत असून या योजनेअंतर्गत गरोदर माता आणि 30 दिवसापर्यंतच्या बालकांना वाहन,उपचार,तपासण्या व आहार आदि सर्व सेवा मोफत देण्यात येत आहेत. तसेच आरोग्य संस्थांमध्ये प्रसुतींचे प्रमाण वाढवावे आणि माता व बालक यांची काळजी घेवून त्यांच्या मृत्युचे प्रमाण कमी करणे हा या कार्यक्रमाचा उदृदेश असल्याने या योजनेचा लाभ गरोदर महिलांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. आर. हाश्मी यांनी केले आहे.
गरोदर महिलांसाठी सरकारी दवाखान्यात बाळंतपण पूर्णपणे मोफत, औषधे, रक्त-लघवी व सोनोग्राफीसारख्या तपासण्या, रक्तपुरवठा (संस्थेतील उपलब्धतेनुसार) या सर्व सेवा मोफत्देण्यात येत आहेत. घरापासून दवाखान्यापर्यंत आणि परतीची वाहनाची मोफत व्यवस्था करण्यात येते तसेच सामान्य बाळंतपण झाल्यास 3 दिवस तर शस्त्रक्रिया झाल्यास 7 दिवस मातेस मोफत आहार देण्यात येतो.
नवजात बालक आजारी असेल तर त्याला देखील 30 दिवस मोफत उपचार देण्यात येतात. संस्थेतील उपलब्धतेनुसार औषधे, तपासण्या, रक्तपुरवठा आदि सेवा मोफत देण्यात येतात. घरापासून संदर्भ सेवा देण्यासाठी दवाखान्यापर्यंत आणि परत घरी जाण्यासाठी मोफत वाहन व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात येते. वाहनासाठी संपर्क कॉल सेंटरही कार्यान्वित करण्यात आले असून 102 अथवा 02472-226911 या क्रमांकावर संपर्क साधल्यास वाहनाची मोफत व्यवस्था केली जाते.
अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.