.jpg)
केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाचे विविध विभाग, उस्मानाबाद जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद प्रशासन आणि तुळजापूर नगर परिषदेच्या सहकार्याने तुळजापूर येथे 27 ते 29 नोव्हेंबर या दरम्यान या भारत निर्माण लोकमाहिती अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. युवक मेळाव्याने या अभियानाची सांगता झाली. या सत्रात माहिती अधिकार कायद्याचे अभ्यासक शिवाजी राऊत, अलियावर जंग राष्ट्रीय श्रवण विकलांग संस्थानचे डॉ.त्र्यंबक दुनबळे यांचे व्याख्यान झाले. पत्र सूचना कार्यालयाचे संचालक प्रशांत पाठराबे, माध्यम अधिकारी मोहमद अख्तर सईद, टाटा इन्स्टिटयुट ऑफ सोशल सायन्सेसचे ग्रंथालय विभागाचे उपसंचालक डॉ. बी.काझी, जिल्हा माहिती अधिकारी दीपक चव्हाण यांची यावेळी उपस्थिती होती.
माहिती अधिकार कायद्याबाबत बोलताना श्री. राऊत म्हणाले की, हा कायदा सर्वसामान्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. प्रशासनात पारदर्शकता येण्यासाठी आणि सर्वसामान्याना शासकीय कामकाजातील पध्दती समजण्यासाठी हा कायदा उपयुक्त आहे. केवळ प्रशासनाला वेठीस धरण्यासाठी या कायद्याचा वापर करु नये तर प्रशासन गतीमान होण्यासाठी त्याचा सकारात्मक उपयोग करावा,असे आवाहन त्यांनी या कायद्याचा वापर करणा-या कार्यकर्त्यांना केले.
बहुतांशी कायदे हे सर्वसामान्यांवर नियंत्रण ठेवतात मात्र माहितीचा अधिकार कायदा लोकप्रतिनिधी आणि प्रशासनावर नियंत्रण ठेवत असल्याचे त्यांनी सांगितले. अलियावरजंग संस्थेचे डॉ. दुनबळे यांनी त्यांची संस्था अपंग पुनर्वसन क्षेत्रात करत असलेल्या कार्याची माहिती दिली.
यावेळी संचालक पाठराबे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते या प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या विविध विभागांच्या स्टॉल्स धारकांना प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.
तीन दिवस चाललेल्या या अभियानास पालकमंत्री मधुकरराव चव्हाण, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ.सुभाष व्हट्टे, कृषी सभापती पंडित जोकार यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ. के.एम. नागरगोजे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एल.हरिदास, जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी,पदाधिकारी आणि वरिष्ठ अधिका-यानी भेटी दिल्या.