उमरगा : उमरगा व लोहारा तालुका ख-या अर्थाने शिक्षण प्रेमी असून साक्षरतेच्या बाबतीत पुढे आहे. हीच परंपरा सर्वांनी जोपासावी, जिल्‍हा परिषदेच्या माध्यमातून शिक्षण संस्था, सेवाभावी संस्थांचा दर्जा वाढविण्याचे काम शासनाने हाती घेतले आहे. संस्थात्मक वाढीपेक्षा गुणात्मक वाढीकडे लक्ष देण्याची काळाची गरज आहे, असे सांगून मुलींच्या शिक्षणाकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. प्रत्येक कुटूंबाला भेटून शिक्षणाची आवड मुलींमध्ये निर्माण करण्‍याचे आवाहन माजी राज्‍यमंत्री तथा औसाचे आमदार बसवराज पाटील यानी उमरगा येथे आदर्श शिक्षक पुरस्‍काराच्‍या वितरणप्रसंगी केले.
उमरगा येथील पंचायत समिती सभागृहामध्‍ये तालुका शिक्षक पुरस्कार वितरण संभारंभ मोठ्या थाटाने पार पडले. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्‍हणून आ. बसवराज पाटील हे बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी पं.स. सभापती अक्षरा सोनवणे हे होत्‍या.  जि.प.चे अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते जि.प.सदस्य दिलीपराव भालेराव, हरिष डावरे, कैलास शिंदे, धनश्री ढगे, पं.स.सदस्य मदन पाटील, सौ.रेखा कमळे, उपसभापती बाबा काझी, भास्कर शिंदे यांच्यासह सर्व पं.स. व जि.प.चे सदस्य उपस्थित होते. यावेळी १३ शिक्षकांना तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार देवून गौरविण्यात आले. आ.बसवराज पाटील यांच्या हस्ते पुरस्कार वितरीत करण्यात आले.
डॉ.सुभाष व्हट्टे म्हणाले की, डॉ.राधाकृष्णन यांनी सातत्याने शिक्षणाची पताका फडकावली आहे. शिक्षक हा देश, राष्ट्र घडविण्याचे काम करतो. शिक्षकाची मानसिकता चांगली असली पाहिजे. शिक्षणात गुणवत्ता ही फार महत्वाची बाब असून शिक्षण हे श्रमातून मिळाले पाहिजे. शिक्षण हे बंदुकीतून येता कामा नये. शिक्षक हा समाजाचा शिल्पकार असल्‍याचे सांगितले. अध्यक्षीय समारोपात सौ. अक्षरा सोनवणे म्हणाल्या की, आजचा पुरस्कार हा नव्या पिढीला घडविण्याचा पुरस्कार आहे. 
तालुका शिक्षक पुरस्कार २०११-१२ चे विजेते उमशेट्टे बसवण्णाप्पा मुदाप्पा, गायकवाड पांडूरंग विश्वनाथ, तेलंग विठ्ठल व्यंकट, मंडले तुळशीराम श्रीपती, श्रीमती कलशेट्टी स्वरुपात चंद्रकांत चौधरी नंदकुमार बाबुराव, कांबळे वैभव यादवराव, पवार मारुती लक्ष्मण, आनंदगावकर शाहुराज बाबूराव, खुळ धर्माण्णा सिद्राम, गवंडी युसूफ महेबुब, पठाण इस्माईलखाँ महेबुब खाँ. तर २०१२-१३ च्या पुरस्कार विजेते राठोड कुंडलिक पांडूरंग, पाटील गोविंद माधवराव, स्वामी प्रविण विरभद्रय्या, स्वामी रविंद्र अविनाश, श्रीमती महानुर बबिता खंडेराव, चव्हाण युवराज महादेव, माने दत्तात्रय राम, श्रीमती गायकवाड वंदना विठ्ठलराव, पांचाळ गुरुनाथ विठ्ठल, श्रीमती पोतदार विना सुरेश, चौधरी सुधाकर रेवाप्पा, श्रीमती अहंकारी शोभा दिगंबरराव, जाधव गणेश गुरुनाथराव (हस्तकला शिक्षक) हे आहेत. 
       प्रास्ताविक गटशिक्षण अधिकारी सुधा साळूंके यांनी केले. या सोहळ्यास गोविंद पाटील, माजी उपसभापती दगडू पाटील, लोहारा पं.स.सभापती आशीफ मुल्ला, भालचंद्र लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते. गटविकास अधिकारी बि.बी.खंडागळे नायब तहसीलदार विद्याचरण कडवकर, डि.आर.किरनाळे यांच्या सह सर्व पंचायत समिती कर्मचारी अधिकारी यांनी कार्यक्रम पार पाडण्यासाठी प्रयत्न केले. सुत्रसंचलन सौ.बडोरे, आरणे यांनी केले तर आभार शिक्षण विस्तार अधिकारी बनसोडे यांनी मानले. 

 
Top