
ना. मधुकरराव चव्हाण यांनी आपल्या ओघवत्या, सोप्या भाषणात 1972 च्या दुष्काळापासून ते आजपर्यंतच्या परिस्थितीचा तसेच अनेक लोक कल्याणकारी योजनांचा उहापोह केला. सरकारी योजनेतून गाव समृध्दीकडे नेत असतांना व्यसनमुक्त केले पाहिजे. सध्या अनेक गांवामध्ये महिला सरपंच आहेत. तेंव्हा स्वतःच्या घरापासून ते गाव व्यसनमुक्त करण्यापर्यंतची मोठी जबाबदारी महिला सरपंचाची आहे, असे प्रतिपादन ना. चव्हाण यांनी केले.
प्रत्येक गाव हगणदारी मुक्त झाले पाहिजे त्याशिवाय निरोगी जीवन जगता येणार नाही. आजकाल घरोघरी सर्व सुखसुविधा आहेत. परंतु शौचोलय नाही. हे चित्र काही योग्य नाही अशा शब्दात खंत व्यक्त करून केंद्र व राज्य सरकारच्या अनेक कल्याणकारी योजना आहे रे च्या घरी जाउ नयेत तर नाही रे च्या घरी गेल्या पाहिजेत. त्यासाठी सरकारी योजना पदरात पाडून घ्या अशा कामासाठी पैसा कमी पडणार नाही, अशी ग्वाही ना. चव्हाण यांनी दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पाणलोट विकास कार्यक्रमासाठी जिल्हयात 220 गावांसाठी 216 कोटींची तरतुद केली आहे. संबंधित ग्राम सेवक व सरपंचानी याचा अभ्यास करून पाणलोट विकासाचा आराखडा बनवावा अशी सूचना पालकमंत्री चव्हाण यांनी केली. 1972 च्या दुष्काळाच्या वेळेचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी अन्यधान्याचे उत्पादन वाढवून या बाबत महारष्ट्राला स्वयंपूर्ण केले. या वरून वाईटातूनही चांगले कसे निर्माण करता येते हे दिसून येते, असे पालकमंत्री म्हणाले.
* वॉटर बजेटींगही काळाची गरज - जिल्हाधिकारी
यंदाच्या पावसाळयात नेहमी पेक्षा 50 टक्के पाउस कमी झाला. त्यामुळे आहे ते पाणी पुरवुन वापरण्यासाठी वॉटर बजेटींग करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन या प्रसंगी जिल्हाधिकारी नागरगोजे यांनी केले. पाणी टंचाईच्या समस्येवर बोलतांना त्यांनी छतावर साचलेले पाणी वापरणे, रिचार्ज बोअर, जल पुनर्भरण आदि बाबींचा उल्लेख करून पाण्याच्या बचतीवर जास्त भर दिला. त्याचप्रमाणे राष्ट्रीय ग्रामीण रो.ह.यो. ची माहिती पण त्यांनी दिली.
या लोक माहिती अभियानाच्या निमित्ताने सरपंच व ग्राम सेवक यांच्यासाठी तयार केलेल्या पाच माहिती पुस्तिकांचे प्रकाशन पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. उदघाटन सोहळयाच्या प्रारंभी पुणे पत्र सूचना कार्यालयाचे संचालक प्रशांत पाठराबे यांनी प्रास्ताविकामध्ये अभियानाची भुमिका विशद केली. हे अभियान म्हणजे केवळ प्रदर्शन नव्हे तर मल्टिमेडिया कॅम्पेन म्हणजे बहुविध माहितीचे अभियान आहे. असे त्यांनी स्पष्ट केले. तांबवेश्वर कला पथकाचे शाहिर ठोंबरे व त्याच्या पथकाने पहाडी आवाजात गायिलेल्या महाराष्ट गीताने उपस्थित हजारो नागरिकांच्या अंगावर रोमांच उभे केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण यांनी तर आभार प्रदर्शन क्षेत्रीय प्रचार कार्यालयाचे सुमित दोडल यांनी केले.
* क्षणचित्रे
काल सोमवारी मध्यरात्री झालेल्या पावसाचा अभियानाचा 40 स्टॉलवर आणि माणसांच्या गर्दीवर काही परिणाम झाला नाही. विद्यार्थींची जनजागरण रॅली नवीन बस स्थानकात पोहचल्यापासून हे ठिकाण गर्दीने फुलण्यास सूरूवात झाली. जिल्हाधिकारी नागरगोजे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हरिदास, नगर पालिकेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी अभियान स्थळी आल्यावर जिल्हा परिषदेच्या स्टॉल्सची पाहणी केली.
* महिलांसाठी दि. 28 रोजी आरोग्य मेळावा
ग्रामीण व सर्वच महिलांसाठी उद्या बुधवारी सकाळी 10 ते 5 या वेळी तुळजापुर येथील सरकारी दवाखान्यात मोफत रोग निदान शिबिर होणार आहे. यावेळी जमेल तितकी औषधी मोफत देण्यात येतील अशी माहिती पुणे पत्र सूचना कार्यालयाचे संचालक प्रशांत पाठराबे यांनी प्रास्ताविकात दिली.