उस्मानाबाद -: सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने जिल्हा संपर्क अध्यक्ष कर्णबाळा दुनबळे यांच्या नेतृत्वाखाली दुपारी बारा वाजता विविध मागण्यांसाठी विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये मनसेचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठया संख्येने सहभागी झाले होते.
शहरातील जिजामाता उद्यानापासून मोर्चास सुरूवात होऊन शिवाजी चौक मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर जावून त्याचे सभेत रूपांतर झाले. यावेळी दुनबळे यांच्यासह अनेक पदाधिका-यांनी आपल्या भाषणातून शासनावर सडकून टीका करून खरपूस समाचार घेतला. त्यानंतर जिल्हाधिका-याना निवेदन दिले. मनसेच्या मागण्या पुढीलप्रमाणे आहेत. उमस्मानाबाद जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करून जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक फिस माफ करावी, शेतकर्यांची कर्ज वसुली व वीज बिल वसुली थांबवून शेतीपंपाचे वीज कनेक्शन तोडणेही थांबवावे, उसाला तीन हजाराप्रमाणे पहिला हप्ता द्यावा, आत्महत्या केलेले नागझरवाडी येथील ऊस उत्पादक शेतकरी वालचंद साळुंके यांच्या कुटुंबास नुकसान भरपाई देण्यात यावी, विविध कारखान्यातील कामगारांचे थकीत वेतन तात्काळ देवून कारखाने पूर्ववत सुरू करावेत, राष्ट्रीयकृत बँकांकडून होणारी शेतकर्यांची अडवणूक थांबवावी, दुष्काळी परिस्थिती पाहता रेशन दुकानातून तेल व साखरेसह अन्य धान्य पुरवठा व्हावा, उस्मानाबाद शहरातील घरकूल योजना सुरू करावी, उजनीचे पाणी डिसेंबर अखेरपर्यंत शहरवासियांना देण्यात यावे, सुशिक्षित बेरोजगाराना दरमहा पाचशे रूपये भत्ता द्यावा.
या आंदोलनात जिल्हाध्यक्ष अनिल मंजुळे, जालना जिल्हाध्यक्ष सदाशिवे, जिल्हा चिटणीस दिनेश देशमुख, मिलिंद चांडगे, महिला आघाडीच्या मिनाताई पाटील, प्रशांत नवगिरे, नगरसेवक गणेश शेंडगे, बाळासाहेब कोठावळे, तेरणा कारखाना कामगार संघटनेचे अध्यक्ष देशमुख अविनाश साळुंके, जलाल शेख आदी पदाधिका-यासह जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.