महाराष्ट्र विधानमंडळाचे यावर्षी नागपूर येथे होणारे अधिवेशन अनेक दुर्मिळ योगायोगांनी कायम आठवणीत राहणार आहे. महाराष्ट्रात लोकशाहीचा पाया भक्कम करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे आणि तळागाळातल्या माणसांपर्यंत लोकशाहीचे लाभ पोहोचविणाऱ्या महाराष्ट्र विधिमंडळाचा यावर्षी अमृतमहोत्सव आहे. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण तसेच हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांचे हे जन्म शताब्दीवर्ष आहे. तसेच राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या महाराष्ट्र शाखेचे हे हीरक महोत्सवी वर्ष आहे. याबरोबरच आज आपली स्वतंत्र ओळख निर्माण करीत दिमाखात उभ्या असलेल्या नागपूर येथील विधानभवनाच्या इमारतीच्या पायाभरणीस शंभर वर्षे पूर्ण होत आहेत.
 * अमृत महोत्सवी विधिमंडळ
     1935 च्या भारत सरकार कायद्याने देशात संघराज्य शासन पद्धतीचा स्वीकार करण्यात आला. प्रांतांना स्वायत्तता देण्यात आली. याचेच फलीत म्हणजे तत्कालीन मुंबई प्रांतात जुलै 1937 मध्ये विधानसभा व विधान परिषद अशी दोन सभागृहे अस्तित्वात आली. 175 सदस्य असलेल्या विधानसभेचे पहिले अधिवेशन 19 जुलै 1937 रोजी तर 29 सदस्य असलेल्या विधानपरिषदेचे पहिले अधिवेशन 20 जुलै, 1937 पुणे येथील कौन्सील हॉलमध्ये भरले होते. या घटनेला 75 वर्षे होत आहेत. 75 वर्षाच्या या अखंडित परंपरेचा गौरव करण्याच्या निमित्ताने विधानमंडळाचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. या अमृत महोत्सवाचे उद्घाटन तत्कालीन राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते 18 ऑक्टोबर, 2011 रोजी विधानभवन मुंबई येथे करण्यात आले. या निमित्ताने वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. संसदीय लोकशाहीमध्ये विधिमंडळाचे स्थान अतिशय महत्त्वाचे आहे. मागील अर्ध शतकाचा इतिहास पाहता महाराष्ट्राचे विधानमंडळ निकोप लोकशाही दृढमूल करण्याकरिता नेहमीच कार्यरत राहीले आहे. राज्यालाच नव्हे तर संपूर्ण देशाला पथदर्शी ठरणारे कायदे या विधिमंडळाने दिले आहेत. अनेक दिग्गज नेत्यांची परंपरा या विधिमंडळास लाभली आहे. न्याय, स्वतंत्र, समता व बंधुत्वाची शिकवण या दिग्गजांनी दिली. त्यांच्या शिकवणीनुसार राज्याच्या विधिमंडळाची वाटचाल सुरु आहे.
* यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्ष
     महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून सार्थ गौरव केला जातो. त्यांची जन्मशताब्दी मोठ्या उत्साही वातावरणात साजरी करण्यात येत आहे. यशवंतराव चव्हाण हे सर्वार्थाने लोकोत्तर लोकनेता होते. मुत्सद्दी राजकारणी, व्यवहारचतुर, कुशल प्रशासक, अफाट लोकसंग्राहक, साहित्यिक, चतुरस्र वक्ता, कलारसिक, तत्त्वचिंतक, दूरदृष्टीचा नेता अशा विविध पैलुंनी त्यांचे व्यक्तिमत्व समृद्ध होते.
     संयुक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर यशवंतरावांनी राज्याच्या उभारणीकडे लक्ष केंद्रित केले. शेती, उद्योग, रोजगार, अर्थव्यवस्था या सर्वच क्षेत्रात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणण्याचा ध्यास घेतला. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना करुन त्यांनी महाराष्ट्रातील कारखानदारी आणि उद्योग व्यवसायांना शासकीय अभय देऊन प्रोत्साहन दिले. आधुनिक शेतीला प्रोत्साहन देतानाच मोठमोठ्या धरणांच्या योजनांना आकार दिला. आधुनिक महाराष्ट्राची पायाभरणी करण्याचे काम यशवंतरावांनी  केले. त्यांनी आखून दिलेल्या मार्गावरुन आज महाराष्ट्राची कालक्रमणा सुरु आहे. जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने होणारे त्यांचे स्मरण कृतज्ञता व्यक्त करतानाच प्रेरणादायी देखील ठरत आहे. 
     यशवंतराव चव्हाण यांनी पाहिलेल्या स्वप्नांना मूर्तरुप देण्याचे मोठे कार्य वसंतराव नाईक यांनी केले, त्यांची तब्बल अकरा वर्षांपेक्षा अधिकची कारकीर्द महाराष्ट्राला स्थैर्य देणारी आणि गतिमान करणारी ठरली. वसंतराव नाईक यांना हरितक्रांतीचे जनक मानले जाते. यवतमाळ जिल्ह्यातील गहुली या खेडेगावातून सुरु झालेला त्यांच्या कार्याचा आलेख सतत चढत राहिला. प्रखर बुध्दिमत्ता, संघटन कौशल्य, दूरदृष्टी, अखंड परिश्रम आणि सामान्य शेतकऱ्यांविषयीचा कळवळा या गुणांनी ते यशोशिखरावर पोचले. त्यांच्या काळात महाराष्ट्र अनेक समस्यांनी वेढला होता. अन्नधान्याची टंचाई, अपूर्व दुष्काळ, बाजारभावातील चढउतार, बेरोजगारी अशा प्रश्नांवर त्यांनी कौशल्याने मात केली. अधिक उत्पादन देणाऱ्या आधुनिक शेतीचा प्रसार केला. दुष्काळावर मात करु शकणारी रोजगार हमी योजना आणली. महाराष्ट्राच्या कृषी विकासाला गतिमान करणारी चार कृषी विद्यापीठे स्थापन केली. ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासाचा ध्यास घेताना त्यांना वाढणाऱ्या शहरांचे देखील भान होते. अत्याधुनिक सुविधांनी युक्त अशा नवी मुंबई, सिडको औरंगाबाद या नव्या शहरांची मुहूर्तमेढ त्यांनीच रोवली. महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाचा पाया त्यांच्या काळातच विस्तारला.
    महाराष्ट्राच्या जडणघडणीतील वसंतराव नाईक यांच्या योगदानाचे स्मरण म्हणून 1 जुलै 2012 ते 30 जून 2013 या कालावधित त्यांची जन्मशताब्दी मोठया उत्साहात साजरी होत आहे. या निमित्ताने शासनाने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.  त्यामध्ये मराठवाडा कृषी विद्यापीठाला वसंतराव नाईक यांचे नाव , त्यांचे जन्मगाव गहुली येथे भव्य स्मारक उभारणे, विदर्भ एक्सप्रेसला वसंतराव नाईक यांचे नाव देण्याचा रेल्वे मंत्रालयाला प्रस्ताव, त्यांच्या नावाने पुरस्कार सुरु करणे इत्यादी निर्णयांचा समावेश आहे.
* राष्ट्रकुल संसदीय मंडळ हीरक महोत्सव
     राष्ट्रकुल संसदीय मंडळाची राज्य पातळीवर शाखा स्थापन करुन त्या माध्यमातून विविध उपक्रम राबविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्‍य आहे. जुलै 1952 पासून राष्ट्रकुल संसदीय मंडळाची महाराष्ट्र शाखा कार्यरत आहे. 2012 हे या शाखेचे हीरक महोत्सवी वर्ष आहे. 1964 पासून नागपूर येथे होणाऱ्या अधिवेशन काळात राज्‍याच्या विविध विद्यापीठातील राज्यशास्त्र व लोक प्रशासन या विषयांचा अभ्यास करणाऱ्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी संसदीय अभ्यासवर्गाचे आयोजन केले जाते. संसदीय शासन प्रणालीशी संबंधित विविध संसदपटू व मान्यवरांची व्याख्याने या निमित्ताने आयोजित केली जातात. या अभ्यासवर्गाचे हे 42 वे वर्ष आहे. संसदीय लोकशाही व्यवस्थेचा नव्या पिढीला, प्राध्यापकांना अधिक जवळून परिचय व्हावा आणि या व्यवस्थेविषयी आपुलकी निर्माण व्हावी हा या अभ्यासवर्गाचा उद्देश आहे.
* नागपूर विधानभवन वास्‍तुच्या पायाभरणीची शताब्दी
     नागपूर  येथील विधानभवनाची इमारत  ही एक वैशिष्ट्यपूर्ण वास्तू आहे. सॅण्ड स्टोन आणि चुन्याचा वापर करुन बांधण्यात आलेली ही इमारत पाहता क्षणीच नजरेत भरते. या वास्तुच्या पायाभरणीस 100 वर्षे पूर्ण होत आहेत. या वास्तुच्या बांधकामाचा शुभारंभ चार्लस बॅरॉन हार्डिग्ज ऑफ पेन्सहर्ट, व्हॉइसरॉय ॲण्ड गव्हर्नर जनरल ऑफ पेन्सहर्ट, यांच्या हस्ते 17 डिसेंबर 1912 रोजी झाला. पाच एकर जागेवर उभारण्यात आलेल्या या इमारतीचे डिझाईन प्रसिध्द वास्तु शिल्पकार थॉमस मॉन्टेक्यू यांनी तयार केले होते. इंग्रजी   E या अक्षरासारखी रचना असलेल्या या इमारतीचे बांधकाम 1914 साली पूर्ण झाले.  भारतीय पुरातत्व विभागाने या इमारतीला `अ` दर्जा बहाल केला आहे. पूर्वी ही इमारत कौन्सिल हॉल म्हणून  ओळखली जात होती. पूर्वी विदर्भ हा मध्य प्रदेशचा भाग होता तर नागपूर ही त्याची राजधानी होती. सन 1956 पर्यंत कौन्सिल हॉल मध्ये मध्यप्रदेश विधानसभेची अधिवेशने भरत असत. नागपूर करारानुसार 1960 पासून विधानमंडळाची अधिवेशने महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथे भरविण्यात येऊ लागली. महाराष्ट्र राज्याचे नागपूर येथील पहिले अधिवेशन 10 नोव्हेंबर ते 26 डिसेंबर 1960 या काळात भरले होते.
 
Top