उस्मानाबाद -: पाणी सिंचनाची क्षमता वाढविण्यासाठी  संबधित यंत्रणेनी  आतापासूनच धरण, तलावात साठलेला गाळ काढण्याच्या कामास  प्राधान्य दयावे, तातडीने विहीरीचे पूर्नभरणाची कामे हाती घेवून वेळेत पूर्ण करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. के. एम. नागरगोजे यांनी संबंधित यंत्रणांना दिले.
      येथील जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. नागरगोजे यांनी पाणीटंचाईचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एल. हरिदास, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, आत्माचे प्रकल्प संचालक  व्ही. डी. लोखंडे, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. कोटेचा व संबंधित समितीचे सदस्य यांची प्रमुख उपस्थिती होती.
        यंदा कमी पाऊस झाल्याने पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. शिवाय धरण, तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने पडलेल्या पावसाचे पाणी वाहून गेले. नदी, तलाव, नाले, विहीरी कोरडे पडल्याने दुष्काळसदृष्य स्थिती निर्माण झाली. या संकटाचा सामना करण्यासाठी शिघ्रगतीने उपाय योजना करावी. शेतक-यांना गाळ घेवून जाण्यासाठी गावात दवंडी दयावी. आत्मा या योजनेतून ज्या शेतक-यांची  प्रकरणे प्राप्त होतील, त्यांना प्रचलित नियमानुसार मंजूरी देवून दुष्काळसदष्य परिस्थतीवर मात करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. नागरगोजे यांनी संबंधित यंत्रणेला दिले. कृषी विस्ताराला प्रसार माध्यमांचे सहाय घेवून आकाशवाणी, कृषी विभाग व प्रसार माध्यमांच्या  सहकार्याने  कृषी योजना शेतक-यापर्यंत पोहचणे आवश्यक आहे, हे नमूद करण्यात आले.
 
Top