उस्मानाबाद -: स्वर्णजयंती ग्रामीण स्वरोजगार योजना, महाराष्ट्र  राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियांतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व लेडीज क्लब, उस्मानाबाद यांच्या वतीने स्वयंसहाय्यता समुह-बचतगट निर्मित वस्तुचे जिल्हास्तरीय विक्री व प्रदर्शन २०१२ अर्थात ग्रामसखी-हिरकणी महोत्सवाचे  दि. ८ ते १२ जानेवारी  या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे.या महोत्सवाचे उदघाटन दि. 8 रोजी सायंकाळी ५ वाजता ग्रामविकास व जलसंधारणमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते होणार असून पालकमंत्री मधुकरराव चव्हाण अध्यक्षस्थानी राहतील.या महोत्सवात जिल्हा व जिल्ह्याबाहेरील १०० बचतगटांचे स्टॉल्स सहभागी होणार आहेत.
           उस्मानाबाद शहरातील लेडीज क्ल्ब येथे हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील विविध बचतगटांनी निर्मित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळावी यादृष्टीने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. विविध वस्तुंबरोबरच पैठणी, शालू विक्री करणा-या बचत गटांचे स्टॉल्सही या ठिकाणी सहभागी होणार आहेत. बचतगट प्रदर्शन पाहण्यासाठी येणा-या नागरीकांसाठी बचतगटांच्या खाद्य पदार्थांचे स्टॉल्सही याठिकाणी असणार आहेत.
          उदघाटन कार्यक्रमास खासदार डॉ. पदमसिंह पाटील, राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे, गोदावरी खोरे विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार राहूल मोटे, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे, आमदार सर्वश्री. ओमराजेप्रकाश निंबाळकर, सतिष चव्हाण, ज्ञानराज चौगुले, दिलीपराव देशमुख, राणा जगजितसिंह पाटील, बसवराज पाटील, विक्रम काळे,जिल्हा परिषद उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल, जिल्हाधिकारी डॉ. के.एम. नागरगोजे, जिल्हा परिषदेच्या विविध विषय समित्यांचे सभापती आदिंची उपस्थिती राहणार असल्याचे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ.केशव सांगळे यांनी कळविले आहे.   
            हे प्रदर्शन पाच दिवस सूरु राहणार असून या कालावधीत जिल्ह्यातील अधिकाधिक नागरीकांनी या प्रदर्शनास भेट दयावी, असे आवाहन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने केले आहे.   
 
Top