उस्मानाबाद -:                         राज्याचे पशुसंवर्धन दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी पाणीटंचाई व दुष्काळ निवारणार्थ करावयाच्या उपाययोजनांबाबत उस्मानाबाद तालुक्‍यातील धारुर, वाडी बामणी व केशेगाव या गावांना भेटी देऊन नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या. पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देणे हाच सध्या शासनाचा आणि प्रशासनाचा अग्रक्रम असल्याचे प्रतिपादन ना. मधुकरराव चव्हाण यांनी या दौ-याप्रसंगी केले.
       पालकमंत्री चव्हाण यांच्या या दौऱ्यात जि.प.अध्यक्ष्‍डॉ. सुभाष व्हट्टे, उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, जि.प. सदस्या अर्चनाताई पाटील, लक्ष्मण सरडे, राजेंद्र शेरखाने यांच्यासह गटविकास अधिकारी प्रियदर्शिनी मोरे, तहसीलदार अभिजीत पाटील,  आदी उपस्थित हाते.
          या दौ-यात पालकमंत्री चव्हाण यांनी, ज्या विहिरींना पाणी आहे तेथून पाईप टाकुन पाणी उपलब्ध करुन देण्याच्या सुचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच तेथील ग्रामस्थांच्या अडीअडचणी समजावून घेउन गावातील उपलब्ध असणारे पाणी जनतेस देण्यासाठी जे हातपंप नादुरुस्त आहेत ते दुरुस्त करुन घेणे, ज्या विहिरींना पाणी आहे तेथुन पाईप टाकुन पाणी गावात आणून जनतेस उपलब्ध करुन देणे, तलाव, विहिरींमधील गाळ काढणे व नविन विहिरी घेणे याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सुचना दिल्या.
          ज्यांचेकडे वीज बील थकीत आहे ते तात्काळ भरुन शासनास सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. पालकमंत्री चव्हाण यांनी केशेगाव येथे मंडळ अंतर्गत गावांच्या प्रश्नांसंदर्भात बैठक घेतली. यावेळी अधिकारी वर्गही उपस्थित होता.नागरिकांच्या प्रश्नांची तातडीने दखल घ्यावी. टंचाईसंदर्भातील कोणतेही निर्णय प्रलंबित ठेवू नयेत, ते तातडीने मार्गी लावावेत, जेणेकरुन नागरिकांना या परिस्थितीत दिलासा मिळेल, असे त्यांनी सांगितले. विंधन विहिरींची दुरुस्ती, तात्पुरत्या नळ योजना, गाळ काढणे आदी कामे प्राधान्याने हाती घ्यावीत, असे त्यांनी सांगितले. ज्याठिकाणी उपलब्ध पाणी स्त्रोत आहेत, ते जपून वापरण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
          पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते वाडी बामणी येथे दलित वस्ती सुधार योजनेतून सिमेंट रस्ता व नाली बांधकाम तसेच स्मशानभूमी शेड बांधकाम आदी कामांचा प्रारंभ करण्यात आला. धारुर येथे पालकमंत्री चव्हाण यांनी तेथील पाणीपुरवठा सद्यस्थिती आणि टंचाई उपाययोजनांबाबतची वस्तुस्थिती जाणून घेतली.
      संजय गांधी निराधार योजनेबाबत येणाऱ्या तक्रारी तात्काळ सोडविण्याचे निर्देश त्यांनी यावेळी अधिका-यांना दिल्या.
         दौ-याप्रसंगी संबंधित गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, तलाठी, ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.           
 
Top