सर्व उर्जास्त्रोतांमध्ये तेल हे अत्यंत उपयुक्त आणि महत्त्वाचा उर्जास्त्रोत आहे. तेलाच्या प्रत्येक थेंबाचा उपयोग करता यावा म्हणून रिफायनरीमध्ये  वेगवेगळ्या प्रमाणात उष्णता आणि दाबाच्या सहाय्याने कच्चा तेलावर प्रक्रिया केली जाते. यामुळे तेलाचे त्याच्या गॅस, पेट्रोल, केरोसिन, डिझेल, वंगण यासारख्या वेगवेगळ्या घटकामंध्ये विभाजन होते. विश्वामध्ये तेल काही ठराविक ठिकाणीच सापडते. उत्तर अमेरिका, युएसएसआर, सौदी अरेबिया, मध्यपूर्व आणि उत्तर आफ्रिका ही जगातील काही अग्रगण्य तेल उत्पादक क्षेत्रे आहेत. दुर्दैवाने भारताकडे स्वत:चे तेल आणि गॅस साठे मर्यादीत आहेत. जगाच्या अंदाजे ०.६ टक्के तेल आणि गॅस भारतात उत्पादित होते. त्यामुळे तेल मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या देशांवर आपणांस अवलंबून रहावे लागते. तेल आणि गॅस याचा अपव्यय टाळून त्यांच्या बचतीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
          पी.सी.आर.ए च्या आकडेवारीनुसार भारतात पेट्रोलिएम पदार्थाचा वापर दळणवळण क्षेत्र ५१ टक्के, औद्योगिक क्षेत्र १४ टक्के, घरगुती क्षेत्र १८ टक्के, शेतीसाठी ४ टक्के आणि इतर १३ टक्के असा आहे.
            केंद्रीय तेल आणि नैसर्गिक वायु मंत्रालय आणि तेल उद्योगाच्यावतीने सध्या तेल आणि गॅस बचत पंधरवडा सर्वत्र साजरा होत आहे. दरवर्षी १५ जानेवारी ते ३१ जानेवारी  दरम्यान तेल व गॅस बचत पंधरवडा आयोजित करण्यात येतो. तेल बचतीसाठी समाजात जनजागृती व्हावी या उद्देशाने १९९१ साली प्रथम तेल बचत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर १९९७ सालापासून पुढे तेल बचत सप्ताहा ऐवजी तेल बचत पंधरवडा साजरा करण्यात येऊ लागला. तेल बचतीसोबतच गॅस बचतीचे महत्व ओळखून त्यानंतर 2004 सालापासून हा पंधरवडा तेल आणि गॅस बचत पंधरवडा असा एकत्रित साजरा होत आहे.
             तेल आणि गॅस बचत पंधरवडा २०१३ चे उद्घाटन मुंबईत नुकतेच सह्याद्री अतिथिगृह येथे वैधमापन शास्त्र विभागाचे उपनियंत्रक सुधीर वाघ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी इंडियन ऑईल कॉर्पोरेशनचे कार्यकारी संचालक श्रीकांत बापट, पी.सी.आर.ए.चे संचालक टी. बक्षी, गेलचे भिकु राठोड, हिंदुस्थान पेट्रोलियमचे रजनीश मेहता, तेल कंपन्यांचे राज्यस्तरीय समन्वय बी.एस. परमार तसेच वरिष्ठ व्यवस्थापक एम.एम. खान उपस्थित होते.
          इंडियन ऑईल, गेल, हिंदुस्थान पेट्रोलियम आदी तेल कंपन्यांच्यावतीने जनजागृतीसाठी विशेष मोहिम राज्यभरात मोठ्या प्रमाणात राबविली जात आहे. राज्यभरात या संदर्भातील विविध कार्यशाळा  राबविण्यात  येऊन  तेल  आणि गॅस  बचतीचे महत्त्व जनतेस पटवून देण्यात येत आहे. पेट्रोलजन्य पदार्थाचा साठा सातत्याने कमी होत आहे. पेट्रोलियम पदार्थाचा वापर मात्र दिवसेंदिवस वाढत असल्याने नैसर्गिक संपत्तीच्या संवर्धनासाठी तेल आणि गॅस बचतीची आवश्यकता आहे. तेल आणि गॅस बचत ही काळाची गरज आहे, अशा आशयाची माहिती पत्रके, बॅनर्स, पोस्टर्स मुंबई, नागपूर, पुणे, औरंगाबाद, नाशिक, जळगाव आदी महत्वाच्या शहरासह राज्यभर लावण्यात आली आहेत.
          विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी यासाठी विविध शाळांमधून तेल आणि गॅस बचतीबाबत पेंटिंग, निबंध स्पर्धा आयोजित करुन या स्पर्धेतील विजेत्यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देऊन गौरविण्यात येत आहे.
             केंद्र शासनाने नुकतीच घरगुती वापरासाठीच्या सबसिडीवरील सिलेंडरची मर्यादा नऊ पर्यंत केली आहे. त्यावरील सिलेंडरसाठी बाजारभावाने पैसे मोजावे लागणार आहेत. अशा वेळी गॅस बचतीचे महत्व ओळखून त्याप्रमाणे नियोजन करावे लागणार आहे त्यासाठी जिल्हा पातळीवर गॅस वितरकांच्या मदतीने गृहणींना एल.पी.जी. केरोसिन बचतीबाबतची प्रात्यक्षिके दाखवून त्यांच्यात जनजागृती करण्यात येत आहे.
पर्यावरण आणि ऊर्जेच्या संवर्धनासाठी राज्यभरातील औद्योगिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना तेल आणि गॅस बचतीबाबत तांत्रिकदृष्टया प्रशिक्षण देण्यात येत आहे. तसेच डिझेलवरील सिंचन पंप, ट्रॅक्टर वापरताना इंधन बचतीसाठी करावयाच्या उपाययोजनांबाबतही शेतक-यांनाही मार्गदर्शन करण्यात येत आहे. 

 * विकास माळी
     माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
 
Top