उस्मानाबाद -: गेल्या दोन दिवसापासून येथील लेडिज क्ल्ब मैदानावर सुरु असलेली जिल्हास्तरीय बचतगट निर्मित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री आणि ग्रामसखी-हिरकणी महोत्सवाला तिसऱ्या दिवशीही उस्मानाबादकरांनी  चांगलीच गर्दी केली. स्वत:च्या कष्टातून उत्पादीत केलेल्या वस्तूला मिळालेली ही बाजारपेठ पाहून आणि वस्तू विक्री झाल्यानंतर कष्टाचे मोल झाल्याची भावना आज बचतगटातील महिलांच्या चेहऱ्यावर दिसत होती. या ग्रामसखी आणि हिरकणींच्या कष्टाला दाद देण्यासाठी उस्मानाबादकर गृहिणींनीही आज लेडिज क्लबकडे आपली पावले वळविली आणि या बचतगट महिलांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसू लागले. निमित्त होते, स्वर्णजयंती ग्रामीण स्वरोजगार योजना, महाराष्ट्र  राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियांतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व लेडीज क्लब, उस्मानाबाद यांच्या वतीने स्वयंसहाय्यता समुह-बचतगट निर्मित वस्तुचे जिल्हास्तरीय विक्री व प्रदर्शन-२०१३ अर्थात ग्रामसखी-हिरकणी महोत्सवाचे!
        या महोत्सवात उस्मानाबाद जिल्ह्यासह पुणे, बारामती, चाळीसगाव, लातूर, सांगोला, जालना अशा विविध भागातून बचतगटांनी सहभाग नोंदवला आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेनी दिलेल्या सुविधेमुळे बचतगटामध्ये समाधान दिसले अनेक मान्यवरही या बचतगटांना भेटी देवून त्यांना प्रोत्साहन देत आहेत. हीच प्रोत्साहनाची थाप घेवून अधिकाधिक जोमाने काम करण्याचा उत्साह या बचतगटाच्या महिलांमध्ये असल्याचे प्रत्यंतर आज आले. भेटी देणाऱ्या उसमानाबादकरांना अतिशय आपुलकी आणि जिव्हाळयाने आपल्या बचतगटाची माहिती सांगणाऱ्या या ग्रामसखी आणि हिरकणींनी  शहर वासीयांनाही आपल्या कष्टाची भाकर खाऊ घातली. बचतगटांच्या या खाद्य पदार्थांच्या स्टॉल्सवर अक्षरक्ष: गर्दी पडली होती. पुरणपोळी, मांडे, दही -थालीपीठ, तांबडा-पांढरा रस्सा अशा एकेक पदार्थांचा आस्वाद घेत उस्मानाबादकरांनी या अन्नपुर्णांना अक्षरक्ष; धन्यवाद दिले.
           हे प्रदर्शन व महोत्सव १२ जानेवारीपर्यंत सुरु राहणार असून या प्रदर्शनास भेट देण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एल.हरिदास आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक  डॉ. केशव सांगळे यांनी केले आहे. 
 
Top