उस्मानाबाद -: प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाचा उपक्रम आयोजित करण्यात येतो. उस्‍मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवार दि. ४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व नागरीकांनी याची नोंद घ्यावी तसेच संबंधित यंत्रणांच्या प्रमुखांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
    सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी तसेच अडचणी यांची न्याय व तत्परतेने शासकीय यंत्रणेकडून सोडवणू करण्यासाठी जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, विभागीय आयुक्त आणि मंत्रालय स्तरावर लोकशाही दिन हा उपक्रम राबविण्यात येतो यासंदर्भातील कार्यपध्दती अधिक सूलभ व्हावी, यासाठी आता तालुकास्तरावरही लोकशाही दिनाचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. प्रत्येक महिन्याच्या तिस-या सोमवारी तालुकास्तरावर तर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरावर लोकशाही दिन हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. चारही स्तरावरील लोकशाही दिनाकरीता अर्जदाराने अर्ज विहीत नमुन्यात १५ दिवस आधी २ प्रतीत पाठविणे आवश्यक ठरणार आहे.
    शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने याबाबत दि. २६ सप्टेंबर २०१२ रोजी परिपत्रक जारी केले असून यापुढील काळात विहीत नमुन्यातील अर्जच लोकशाही दिनाकरीता स्वीकारण्यात येतील, असे जिल्हाधिकारी, उस्मानाबाद यांनी कळविले आहे.
    तालुका लोकशाही दिन कार्यक्रमाचे तहसीलदार हे अध्यक्ष असतील तर जिल्हाधिकारी कार्यालयात होणा-या कार्यक्रमाचे जिल्हाधिकारी हे अध्यक्ष असतील. संबंधित स्तरावरील मुख्यालयाच्या ठिकाणी सकाळी १० वाजता हा उपक्रम आयोजित करण्यात येईल.
    संबधितानी आपले अर्ज विहीत नमुन्यात करावेत, तक्रार अथवा निवेदन वैयक्तिक स्वरुपात असावी. चारही स्तरावरील लोकशाही दिनाकरीता अर्जदाराने अर्ज विहीत नमुन्यात १५ दिवस आधी २ प्रतीत पाठविणे आवश्यक राहील. तालुका लोकशाही दिनानंतर एक महिन्याने जिल्हाधिकारी  यांच्या लोकशाही दिन कार्यक्रमात संबंधितांना अर्ज करता येईल. त्यानंतर दोन महिन्यांनी विभागीय आयुक्त लोकशाही दिन कार्यक्रमात तर विभागीय आयुक्त लोकशाही दिनानंतर दोन महिन्यानी मंत्रालय लोकशाही दिनात  अर्ज करता येणार आहे.
    या चारही स्तरावर लोकशाही दिनात न्यायप्रविष्ट प्रकरणे, राजस्व/अपील्स, सेवाविषयक तसेच आस्थापनाविषयक बाबी, विहीत नमुन्यात नसणारे व त्यासोबत आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज, अंतीम उत्तर दिलेले आहे/देण्यात येणार आहे, अशा प्रकरणी पुन्हा त्याच विषयासंदर्भात केलेले अर्ज, तक्रार/निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असेल तर असे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
    सर्वस्तरावरील लोकशाही दिनासाठी अर्ज स्वीकृत केल्यानंतर ज्या विभागाशी संबंधित तक्रार आहे, त्या विभागाच्या विभाग प्रमुखांकडे संबंधित अर्ज पाठविण्यात येईल व सदर विभाग प्रमुख या अर्जातील कार्यवाहीच्या अहवालासह लोकशाही दिनास हजर राहतील.
    तालुका लोकशाही दिनात अर्ज करताना अर्जदारांनी स्वत:चे नाव व पुर्ण पत्ता, दूरध्वनी/मोबाईल क्रमांक, विषय, विनंती/निवेदन/तक्रारीच्या समर्थनार्थ दाखल केलेली कागदपत्रे जोडावयाचे असून सोबत तहसीलदार यांना उद्देशून अर्ज करावयाचा आहे. तालुकास्तरावरील लोकशाही दिन तहसीलदार कार्यालयात होईल. त्यावेळी मुळ अर्जासह उपस्थित रहावे. अर्जाची आगाऊ प्रत लोकशाही दिनाच्या १५ दिवस आधी पाठविणे आवश्यक आहे.
    जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिनात अर्ज सादर करताना अर्जदारांने स्वत:चे नाव व पुर्ण पत्ता, दूरध्वनी/मोबाईल क्रमांक, विषय, तालुका लोकशाही दिनात अर्ज केला होता काय, असल्यास टोकन क्रमांक, तहसीलदारांकडून मिळालेले उत्तर आदि कागदपत्र जोडावयाचे असून सोबत जिल्हाधिकारी यांना उद्देशून अर्ज, तालुका लोकशाही दिनातील टोकन क्रमांकाची प्रत आणि तहसीलदारांच्या उत्तराची प्रत जोडणे आवश्यक आहे.
    लोकशाही दिनाच्या दिवशी सार्वजनिक सुटी असल्यास त्यानंतर येणारा कामकाजाचा दिवस लोकशाही दिन म्हणून पाळण्यात येईल,असे कळविण्यात आले आहे.                              
 
Top