उस्मानाबाद -: लघुउद्योजकांनी बाजारपेठेची गरज लक्षात घेवून तसेच पर्यावरण पुरक उत्पादनांची निर्मिती केली तर त्यांचा उद्योग निश्चितच भरभराटीला येईल. ग्राहकांची विश्वासार्हता मिळविणे सर्वाधिक आवश्यक असून बाजारपेठेत स्पर्धा करताना आत्मविश्वास महत्वाचा असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.के.एम. नागरगोजे यांनी केले.
    पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्‌रमांतर्गत 2012-13 या आर्थकि वर्षात बँकांनी अर्थ सहाय्य दिलेल्या उद्योजकांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी या उदेशाने महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या उस्मानाबाद कार्यालयाच्यावतीने 21 ते 23 जानेवारी या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुलासमोरील जिल्हा परिषदेच्या सभागृहात जिल्हास्तरीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी डॉ. नागरगोजे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उदघाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक आर.बी. भोसले, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक बी.एस. जोशी,जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी अनिल खेडकर, जिल्हा लघु उद्योग संघटनेचे अध्यक्ष श्री. सस्ते आदिंची व्यासपीठावर उपस्थिती होती.
       यावेळी डॉ. नागरगोजे म्हणाले की, जिल्हा उद्योग केंद्रामार्फत जिल्ह्यातील विविध उद्योगांना प्रोत्साहन दिले जात आहे. मात्र याठिकाणी कृषीपुरक तसेच पर्यावरण पूरक उद्योगांना विशेष संधी आहे. त्याचा लाभ येथील उद्योजकांनी घेतला पाहिजे. विश्वासार्हता,बाजारपेठेची ओळख, आत्मविश्वास या तीन गोष्टींची उद्योजकांना उद्योग उभारणीकरताना आवश्यकता आहे. भविष्यातील वाढत्या गरजांना अनुरुप अशी उत्पादने तयार करणे ही गरज असल्याचे त्यांनी नमुद केले.
       जिल्ह्यातील उद्योग घटकांसाठी पुरक मनुष्यबळ तयार करण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्रास बेरोजगारांसाठी प्रशिक्षण कार्यक्‌रम आयोजित करण्यासाठी निधी उपलब्ध करुन दिला जाईल,असेही डॉ. नागरगोजे यांनी सांगितले. उद्योगांच्या वाढीसाठी  जिल्हा प्रशासन सकारात्मक असल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले.
     जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्री. जोशी यांनी आगामी उद्योग धोरणाबाबत माहिती दिली. उद्योगांना मदत करण्याचीच शासनाची भुमिका असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामीण भागातील लघु उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी शासन प्रयत्न करीत असल्याचे ते म्हणाले.
     कार्यक्ररमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते फित कापून तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले. उद्योजकता विकास कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना प्रातिनिधीक स्वरुपात जिल्हाधिकारी डॉ. नागरगोजे यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
    या प्रदर्शनात 15 हून अधिक लघुउद्योजक सहभागी झाले असून हे प्रदर्शन 23 जानेवारीपर्यंत सुरु राहणार आहे. नागरिकांनी या प्रदर्शनास भेट देण्याचे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी खेडकर यांनी केले आहे.
    उदघाटनापूर्वी जिल्हाधिकारी डॉ. नागरगोजे यांनी सर्व उद्योजकांच्या स्टॉल्सना भेटी देवून माहिती घेतली.
 
Top