उस्मानाबाद -: राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मस्यव्यवसाय मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते टाटा सामाजिक विज्ञान संस्था, तुळजापूर येथे राष्ट्रीय ग्रामीण युवक महोत्सवाचे उदघाटन झाले. यावेळी खासदार डॉ. पद्मसिंह पाटील,जि.प.चे अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे, टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे संचालक एस.परशुरामन, अधिष्ठाता एस.पेपीन, रशीद काझी, बाळासाहेब पाटील हे उपस्थित होते.
      या प्रसंगी बोलताना पालकमंत्री चव्हाण म्हणाले की, ही संस्था २७ वर्षापुर्वी रोपटे होते. आता याचे विशाल वृक्षामध्ये रुपांतर झाले आहे. या संस्थेमधील अनेक विद्यार्थी मोठमोठया पदावर कार्यरत आहेत. या ठिकाणी पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब अडवून त्याचे पुनर्भरण पध्दतीने वापर करुन आदर्श निर्माण केला आहे. भूगर्भातील पाण्याचा साठा प्रमाणाबाहेर वापर होत असल्यामुळे पाणीपातळी सातत्याने खालावत आहे. यासाठी पुनर्भरणाव्दारे ही पाणीपातळी वाढवता येते. याकरीता सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. दुष्काळ निवारण, पर्यावरण व पुनर्भरण या कामासाठी येथील विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन गावोगावी जाऊन तेथील जनतेला शिक्षण देणे गरजेचे आहे.
      या कार्यक्रमात डॉ. पद्मसिंह पाटील बोलताना म्हणाले की, या संस्थेत उत्तम व  दर्जेदार शिक्षण असून अनेक विद्यार्थी वेगवेगळया पदावर कार्यरत आहेत. याठिकाणी पाण्याचे नियोजन उत्तम प्रकारे केले आहे. त्यामुळै पाणी कमी पडत नाही. सद्यस्थितीत पाण्याचा वापर काटकसरीने करणे गरजेचे असून भविष्यात पडणा-या पावसाचे पाणी अडवून जमिनीत वेगवेगळया माध्यमातून जिरवणे गरजेचे आहे. शेतातील पिकांना ड्रीप पध्दतीने पाणी देऊन पाण्याची बचत करता येते. यासाठी जनजागृती होणे आवश्यक आहे.
    महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे. या शंभर एकर माळरानावर या संस्थेने प्रतिसृष्टी निर्माण केली असून याठिकाणी अनेक माणिक, मोती, हिरे विद्यार्थ्यी रुपात घडवून उत्तम नागरिक निर्माण केले आहेत असे डॉ. सुभाष व्हट्टे म्हणाले.
    पाणी व पाऊस तयार करणे माणसाच्या हाती नाही, परंतू पडलेल्या पावसाचे पाणी भूगर्भात वेगवेगळया माध्यमातून जिरवणे माणसाच्या हाती आहे. ही संस्था पाणलोट क्षेत्र विकास कामात अग्रेसर असून या संस्थेने ग्रामविकासा बरोबरच राष्ट्र विकासाचे देखील काम  हाती घेतले आहे. याठिकाणी आत्तापर्यंत 6 हजार शेतकऱ्यांना जलसाक्षरता व पुनर्भरणाचे शिक्षण दिले आहे. असे पाणलोट क्षेत्र विकास अभ्यासक गणेश चादरे म्हणाले.
    याप्रसंगी या संस्थेतील प्राध्यापक, विद्यार्थी, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्रीमती उत्कर्षा यांनी केले.
 
Top