उस्मानाबाद -: राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत  पाणीपुरवठा योजना सुरु असलेल्या जिल्ह्यातील ४९ ग्रामपंचायतीना आता पाणीपुरवठा व स्वच्छता उपक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी व ग्रामस्थांचा सहभाग वाढावा, यासाठी प्रशिक्षण  कार्यक्रम  दि. १ फेब्रुवारीपासून आयोजित करण्यात येत आहेत. येत्या  २ मार्चपर्यंत हे प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. तांगडे यांनी कळविले आहे.   
        पाणीपुरवठा योजनेची अंमलबजावणी करताना ग्रामस्थांचा सक्रीय सहभाग वाढावा, लोकसहभागात सातत्य रहावे तसेच पाणी व स्वच्छता उपक्रमाच्या अंमबजावणी ग्रामपंचायत तसेच पाणीपुरवठा व स्वच्छता समिती सदस्यांची भुमिका व जबाबदारी स्पष्ट होण्यासाठी  या क्षमता बांधणी  प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.
    यासाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम २०१२-१३ च्या आराखडयात समाविष्ट ग्रामपंचायतीमधील सरपंच, दोन महिला सदस्य, पाणीपुरवठा व स्वच्छता समितीतील अध्यक्ष, सचिव, अनुसूचित जातीचा प्रतिनिधी, अल्पसंख्याक प्रतिनिधी, अनुसूचित जमातीचा एक प्रतिनिधीसह एकुण दहा समस्यांना प्रशिक्षित केले जाणार आहे. तालुका स्तरावर दोन दिवस चालणाऱ्या प्रशिक्षण सत्रात राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाचे स्वरुप, उदिदष्ट, कार्यपध्दती ,पाणी पुरवठा व स्वच्छता समितीची भुमिका व जबाबदारी, स्वच्छता संकल्पना, महत्व घटक व सद्यस्थिती आणि तांत्रिक पर्याय, पाणी अंदाज पत्रक, भुजल अधिनियम, पाणी गुणवत्ता सनियंत्रण्,  पाणीपटटी व देखभाल दुरुस्ती, ग्रामस्तरीय लेखे व नोंदी प्रक्रिया इ. निदिना ऑनलाईन पध्दती, लोकसहभागाचे महत्व ग्रामविकासात महिलांचा सहभाग या विषयावर प्रशिक्षण दिले जाणार आहे. या कार्यक्रमास संबंधितांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
 
Top