उस्मानाबाद -: जिल्हयाचे पालकमंत्री ना. मधुकरराव चव्हाण यांनी उस्मानाबाद तालुक्यातील उपळा (मा) व हिंगळजवाडी गावांना भेटी देवून तेथे विविध विकास कामांचा शुभारंभ केला. तसेच पाणीटंचाई संदर्भात विविध उपाय योजना करण्यासंदर्भात संबंधित यंत्रणांना निर्देश दिले.   
     उस्मानाबाद तालुक्यातील हिंगळजवाडी येथे स्थानिक आमदार निधीअंतर्गत सुमारे ५ लाख रुपये खर्च करुन बांधण्यात आलेल्या  सिमेंट क्राँक्रीट रस्त्याचा लोकार्पण सोहळा  आणि  उपळा (मा). येथे जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत १५ लाख रुपये खर्च करुन तयार करण्यात येणाऱ्या एम.आय.डी. सी रस्त्याचे  मजबुतीकरण व डांबरीकरणाच्या  कामाचे  भुमिपूजन श्री. चव्हाण यांच्या हस्ते झाले.
    पालकमंत्री चव्हाण यांनी पाणीटंचाई संदर्भात उस्मानाबाद तालुक्यातील उपळा (मा) येथील कुलस्वामीनी तुळजाभवानी शॉपींग सेंटर येथे व हिंगळजवाडी येथील सामाजिक सभागृहात ग्रामस्थांशी चर्चा केली त्यांनी  प्रत्यक्ष गावकऱ्यांशी पाणीटंचाईबाबत संवाद साधून त्यांच्या अडचणी समजावून घेतल्या. शासकीय यंत्रणेस पाणीपुरवठयाबाबत त्वरीत कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. तसेच तरुण युवकांनी गावच्या विकास कामात पुढे येण्याची आवश्यकता त्यांनी प्रतिपादन केली.
    यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे, उपाध्यक्ष संजय पाटील दुधगांवकर, तहसीलदार अभिजीत पाटील, गटविकास अधिकारी प्रियदर्शीनी मोरे, लक्ष्मण सरडे, सुरेश पडवळ, कार्यकारी अभियंता देशपांडे, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य, विविध सेवा सोयायटीचे पदाधिकारी, उपळा ग्रामपंचायतीच्या सरपंच शिला बंडगर, हिंगळजवाडीचे सरपंच राहूल कानडे, बांधकाम विभागाचे उपअभियंता  पाटील, ग्रामसेवक श्री. माळी, उपळयाचे ग्रामविकास अधिकारी एस. एस. ढाकणे  आदि उपस्थित होते.
    पालकमंत्री चव्हाण यांनी शेतकऱ्यांना कोरड्या पडलेल्या तलावातून गाळ नेवून शेतात टाकणचे आवाहन केले. बंद पडलेल्या  विंधनविहीरी पुन्हा सुरु कराव्यात, विहीरीतील गाळ काढावा, खाजगी विहीरी अधिग्रहन करुन त्याव्दारे पाणीपुरवठयाचे नियोजन करावे, आवश्यक तेथे पाण्याचे स्त्रोत असलेल्या ठिकाणाचे भूवैज्ञानिकांकडून सर्वेक्षण करुन त्याठिकाणी विंधन विहीरीचे कामे कामे करावीत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. तसेच शेतकऱ्यांनी वीज देयके वेळेत भरणा करावी, असेही  ते म्हणाले.
    यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. व्हट्टे म्हणाले की.पाणीटंचाई व रोजगार योजनेची कामे होण्यासाठी पालकमंत्री चव्हाण स्वत: लक्ष घालून टंचाई निवारण कार्यात पुढाकार घेत आहेत.
 
Top