दुष्काळाशी सामना करण्यासाठी कोणाला काय करावे लागेल हे सांगता येत नाही. असाच दुष्काळाचा सामना करणारा बलवडी ता. सांगोला येथील एक मजूर युवक दत्तात्रय शिंदे हा सव्वादोन फूट रुंद व १०० ते ११० फूट खोल आड एकट्याने खांदून लोकांना पाण्याची सोय करुन देण्याचे धाडसी काम करीत आहे.
     यासंदर्भात बलवडी येथे जावून त्याच्या धाडसाची ही स्टोरी वाचकांसाठी केली आहे. दुष्काळाचा सामना करताना हाताला काम मिळत नाही, रोजगार हमीची कामे बलवडी परिसरात उपलब्ध नाहीत. म्हणून निराश होवून जीवन संपविण्यापेक्षा अंगमेहनत करुन आपला प्रपंच चालविण्याचे काम बलवडी येथील एक मजूर दत्तात्रय शिंदे याने केले आहे. बलवडीचे इंजिनियर सुरेश यादव यांच्याकडून आड खांदण्यासाठी साहित्य घेवून त्याने सुरु केलेल्या या कामामुळे परिसरातील नागरिकांच्या पाण्याची सोय होत आहे. गेल्या वर्षभरात त्याने ११ आड खांदून दिले आहेत. त्यापैकी आठ-नऊ आडात सध्या पाणी आहे. कांही आडाचे पाणी तीन-तीन तास चालते हेही दुष्काळात विशेष आहे. आपला जीव धोक्यात घालून मोजून केवळ सव्वादोन फूट म्हणजे ३० इंच इतक्या जागेत तो आड खांदण्यास सुरवात करतो आणि बघता बघता तो त्याच जागेत खाली १०० फूट जातो. हे काम करायला त्याला जवळपास ४० ते ५० दिवस लागतात. परंतु यातून त्याला मिळणारी मजूरी मात्र खूपच कमी असल्याचे तो सांगतो. खाली जात असताना तेवढ्याच जागेत बसून खाणकाम करताना माती वर देण्यासाठी एखादा सहकारी तो घेतो. जसे जसे खाली जाईल तसे तसे पाणी लागेपर्यंत आत घाम येवून जीव घाईला येतो असे तो सांगतो. तर १०० फूट जावूनही पाणी लागले नाही आणि कुण्या पाणाड्याने सांगितले की, आता आडवे १०-१२ फूट गेल्यास पाणी लागेल. तर तो आडवेही खांदकाम अडीच फूटाच्याच मापाने करतो. हे करत असताना वरुन माती ढासळेल, जीव जाईल याची भीती वाटत नाही का? असे विचारले असता तो म्हणतो, ‘‘आता भीती नष्ट झाली आहे. भीती आता मरुन गेली आहे. प्रपंच चालवायचा म्हटल्यास काही तरी करावे लागणारच. मग मी लोकांना पाणी मिळवून देण्यासाठी हे काम करतो.’’  त्याच्या या कामाची प्रशंसा सध्या बलवडी परिसरात मोठ्या प्रमाणात होत असून सध्या असे आड घेण्यासाठी शेतकरी वर्ग शिंदे याची भेट घेवून बुकींगही करत आहेत. कारण विंधन विहिर घेण्यासाठी लागणारा खर्च व त्यातून पाणी मिळेल की नाही याची गॅरंटी नसल्याने कमी पैशात हे आड परवडत असल्याचे इंजि. सुरेश यादव यांनी सांगितले. या आडात इंजिन बसवण्यासाठीही शिंदे कांही फुटांवर जागा करुन देतो. आणि त्याला स्वत:ला खाली वर जाण्यासाठी कांही खाचा मारतच तो खाली जातो. मग मात्र कसल्या दोरीचाही आधार न घेता खाचेच्या आधारे तो सहजरित्या आडात जातो आणि वर येतो. इतरत्र हाताला काम नाही, खायला काही नाही, शेतीत पिकले नाही, कर्ज झाले म्हणून आत्महत्या करणार्‍या लोकांसाठी शिंदे याचे हे धाडस नक्कीच उपयोगी ठरेल यात शंका नाही.

राजेंद्र यादव
सांगोला 
मो. ९४२३९६९६४४
 
Top