उस्मानाबाद -: जिल्हा रेशीम कार्यालयाच्या वतीने शेतक-यांसाठी रेशीम शेती अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे. दि.२६ ते २८ या दरम्यान नांदेड, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यातील रेशीम शेती शेतकरी पाहणार आहेत. या दौ-यासाठी जिल्हाभरातून ८२ शेतकरी मंगळवारी रवाना झाले.
          उस्मानाबाद जिल्ह्यापेक्षा अन्य जिल्ह्यात रेशीमचे उत्पादक कसे घेतले जाते, त्यांची पध्दत आणि उत्पादन पाहण्यासाठी या दौ-याचे आयोजन करण्यात आले आहे.या दौ-यासाठी जिल्हा रेशीम कार्यालयाच्या वतीने दोन बस करण्यात आल्या असून, प्रत्येक शेतक-यांना प्रवास भत्ता देण्यात आला आहे. या शेतक-यांना मंगळवारी साडेबारा वाजता निरोप देण्यात आला.त्यांना शुभेच्छा देण्यासाठी जिल्हा रेशीम विकास अधिकारी श्रीमती पी.एस.गणाचार्य, रेशीम अधिकारी एन.बी.बावगे आदी उपस्थित होते.
        यावेळी बोलताना श्रीमती गणाचार्य म्हणाल्या की, उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतक-यांचा कल आता रेशीम पिक घेण्याकडे वळला आहे. जवळपास ३८० एकर क्षेत्रात सध्या रेशीमचे पिक आहे.उस्मानाबाद,कळंब,भूम तालुक्यातील जवळपास २७० शेतक-यांनी रेशीमचे उत्पादन सुरू केले आहे.रेशीमचे प्रती एकर दरवर्षी ५ क्विंटल उत्पादन निघते. साधारण एक एकरात शेतक-यांना वार्षिक दीड लाख रूपये मिळतात. खर्च केवळ २० ते ३० टक्के आहे.शेतक-यांना जिल्हा रेशीम कार्यालयाच्या वतीने अनुदानाबरोबर त्यांना त्यांना तांत्रिक मार्गदर्शन केले जाते.
         सध्या रेशीम कोषाला सोन्याचा भाव मिळत आहे.प्रती किलो ३८० ते ४२० रूपये भाव मिळत आहे.
 
Top