उस्मानाबाद :- पाणीटंचाई दुष्काळ निवारणार्थ शासकीय यंत्रणेनी तात्पुरती व पेयजल योजनेतून जास्तीत जास्त पाणीपुरवठ्याची योजनांची कामे  हाती  घेवून ती तात्काळ पुर्णत्वास न्यावी. टंचाईग्रस्त गावात टॅंकरव्दारे पाणीपुरवठा करुन जनतेची तहान भागवावी. दुष्काळ निवारणार्थ कार्यात सूतगिरण्या व साखर कारखान्यांनी जनावरांसाठी पिण्याचे पाणी व छावण्या उभारण्याच्या कामात योगदान दयावे, असे आवाहन  राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्य व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी तुळजापूरकडे येथील शासकीय विश्रामगृहात सकाळी विविध शासकीय यंत्रणेचे अधिका-यांसमवेत पाणीटंचाई दुष्काळ निवारणार्थ आयोजित बैठकीत केले.
        यावेळी जिल्हा परिषदेचे  कृषी सभापती पंडित जोकार, तुळजापूर पंचायत समितीचे उपसभापती प्रकाश चव्हाण, जिल्हा परिषदेचे सदस्य धीरज पाटील, बंडगर, सिद्रामअप्पा मुळे, तुळजापूर कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन पाटील यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एल. हरिदास, तहसीलदार व्ही.एल. कोळी, गटविकास अधिकारी तृप्ती ढेरे, पाणी पुरवठा विभागाचे  उपअभियंता श्री.देवकर, डी.आर. राखुंडे, ए.एस.खैरदी ,तालुका कृषी अधिकारी श्री. जाधव आदि उपस्थित होते.
         विंधन विहीर घेतलेल्या ठिकाणी तात्काळ मोटार बसवून पाणी पुरवठा करावेत या कामात कुचराई केल्यास त्याची गंभीर दखल घेण्यात येईल, ज्या गावातील हातपंप नादुरुस्‍त आहेत त्या तात्काळ दुरस्ती करावी, बंद पडलेल्या विहीरीतील गाळ काढावा. तात्पुरती नळ योजनेस प्राधान्य देवून ती वेळेत पूर्ण करावेत असेही पालकमंत्री श्री. चव्हाण म्हणाले. तात्पुरत्या योजनेतून पाईपलाईन टाकून त्या गावात पाणीपुरवठा करावा. नादुरुस्त पाईपलाईनची दुरुस्ती करावी, असेही निर्देश त्यांनी संबधितांना दिले. जंगलातील जनावरे जगली पाहिजेत यासाठी वनविभागाने जनावरांसाठी ठेवण्यात येणाऱ्या हौद/टाकीत फिरत्या टॅंकरव्दारे पाणी पुरविण्याची सोय करण्याची व्यवस्था करावी. पिण्याच्या पाणीपुरवठा कामी निधीची कमतरता कमी पडू दिली जाणार नाही असेही त्यांनी सांगितले. तुळजापूर तालुक्यात शासनाने २ हजार ५०० घरे बेघरांसाठी मंजूर केले असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली.
 
Top