उस्मानाबाद -: महिला व बालविकास विभागाच्यावतीने नुकताच बालगृहातील बालकांसाठी चाचा नेहरु बाल महोतसव आयोजित करण्यात आला होता. जिल्ह्यातील विविध बालगृहातील बालकांनी या स्पर्धेत सहभाग घेवून हा महोत्सव यशस्वी केला. संपूर्ण स्पर्धा पारदर्शक पध्दतीने पार पाडण्यात आल्या, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यु.पी.बिरादार यांनी दिली आहे.
    जिल्ह्यातील सर्व कार्यरत बालगृहांना या स्पर्धेसाठी तसेच महोत्सवासाठी निमंत्रित करण्यात आले होते.बालगृहातील बालके तसेच त्यांच्या सोबतच्या कर्मचाऱ्यांसाठी विठाबाई बालकाश्रम,शाहूनगर तर मुली व महिलांकरीता स्वाधारगृह,आनंदनगर येथे निवास व्यवस्था करण्यात आली होती. जिल्हा क्रीडा संकुलासमोरील महिला व बालविकास विभाग, जिल्हा परिषद यांच्या सभागृहात सर्व संबंधितांसाठी भोजन व नाष्टाची व्यवस्था करण्यात आली होती तसेच या ठिकाणी व स्पर्धा ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोयही  उपलब्ध करुन देण्यात आली होती. संपूर्ण स्पर्धा पारदर्शक आणि निपक्षपातीपणे पार पाडाव्यात यासाठी विविध स्पर्धांसाठी तज्ज्ञ पंचांची नियुक्ति करण्यात आली होती. कोणत्याही बालकाश्रमाबाबत दुजाभाव न करता ही स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यात आली असे श्री.बिरादार यांनी कळविले आहे.
    स्पर्धेच्या खर्चाबाबत तसेच विविध देयकांबाबत निधी प्राप्त होताच तो अदा करण्यात येणार असल्याचे त्यांनी कळविले आहे.
 
Top