उस्मानाबाद -: ज्या तालुक्यात 50 टक्के पेक्षा कमी पर्जन्यमान किंवा कमी पेरण्या झाल्या आहेत. तसेच अवर्षणप्रवण भागातील सरासरीच्या 50 टक्के पेक्षा कमी पर्जन्यमान किंवा पेरण्या झाल्या आहेत अशा तालुक्यात दुष्काळी/टंचाईसदृश्य परिस्थिती जाहीर केली आहे. अशा भागातून रोजगारासाठी तात्पूरत्या स्वरुपात इतरत्र स्थलांतरीत होणा-या शिधापत्रिकाधारकांना त्यांनी  ज्या ठिकाणी वास्तव्य केले आहे, त्या ठिकाणी शिधापत्रिका व त्यावरील शिधावस्तू देण्याबाबत  कार्यवाही करण्याबाबत शासननिर्णय जारी करण्यात आल्याचे   जिल्हा पुरवठा अधिकारी,उस्मानाबाद यांनी कळविले आहे. 
        एखाद्या जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारक असलेले पूर्ण कुटूंब रोजगारासाठी व तात्पूरत्या वास्ताव्यासाठी दुसऱ्या जिल्ह्यात स्थलांतरीत होणार असेल तर संबंधित तहसीलदार/शिधावाटप अधिकारी हे त्यांना  ज्या महिन्यापासून असे कुटूंब स्थलांतर होईल त्या महिन्यांपासून   तात्पुरत्या स्वरुपात शिधावाटप बंद केलेले आहे असे  शिधापत्रिकेवर लिहून देतील. त्याच प्रमाणे  जर एखाद्या कुटूंबातील फक्त काही सदस्य स्थलांतर करणार असतील तर किती युनीटचे शिधावाटप ज्या महिन्यापासून तात्पूरत्या स्वरुपात बंद केले आहे त्याबाबत मुळ शिधापत्रिकेची तसेच त्या शिधापत्रिकेच्या दुय्यम प्रतीवरही अशी नोंद संबंधित अधिकारी करतील. मात्र शिधापत्रिकाधारकाच्या कुटूंबातील जे सदस्य स्थलांतर करणार नाहीत, त्यांच्या युनिटनुसार मुळ ठिकाणी धान्य पुरवठा सुरु ठेवण्यात येईल.
         संबंधित संपूर्ण कुटूंब अथवा त्या कुटूंबातील काही सदस्य ज्या जिल्ह्यात रोजगारासाठी व तात्पूरत्या वास्तव्यासाठी जातील त्या ठिकाणच्या तहसीलदार /शिधावाटप अधिका-यांनी मुळ जिल्ह्यातील तहसीलदार /शिधावाटप अधिका-याचे नोंद असलेली शिधापत्रिका/शिधापत्रिकेची दुय्यम प्रत सादर करणा-या शिधापत्रिकाधारकास त्या ठिकाणी असेपर्यंत तात्पूरत्या स्वरुपात मुळ शिधापत्रिकेनुसार उदा. अंत्योदय, बीपीएल, केशरी, अन्नपूर्णा पामतेल धान्य, केरोसिन व साखर व शिधावस्तूंचा पुरवठा करावा, असेही या शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. 
 
Top