उस्मानाबाद -: जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत आहे. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी दिवसरात्र भटकंती करावी लागत आहे. याबाबींचा विचार करुन उस्मानाबाद तालुक्याच्या गट विकास अधिकारी श्रीमती प्रियदर्शनी मोरे यांनी पंचायत समिती,उस्मानाबाद कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीमध्ये दुष्काळी स्थितीत दुष्काळी परिस्थितीचा विचार करुन नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी आवाहन केले. या आवाहनास सर्व कर्मचाऱ्यांची तात्काळ प्रतिसाद देऊन त्यांचे एक दिवसाचे वेतन रुपये 44 हजार इतकी रक्कम झाली. या रक्कमेतून पाटोदा येथील विंधन विहीरीवर नवीन विद्युतपंप खरेदी करुन बसविण्यात आला आहे. यामुळे या भागातील नागरिकांना पिण्याचे पाणी मिळण्यास मदत झाली. अशाच प्रकारचा उपक्रम अन्य ठिकाणी राबवून सहकार्य केल्यास दुष्काळावर मात करता येऊ शकते, असे मत गट विकास अधिकारी श्रीमती मोरे यांनी यावेळी व्यक्त केले.