उस्मानाबाद जिल्ह्यातील श्री तुळजाभवानीचे पावनस्थान असलेले श्रीक्षेत्र तुळजापूर म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत! लाखो भाविक दरवर्षी श्री तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येत असतात. याचबरोबर आंध्र प्रदेश, कर्नाटक राज्यातील भाविकही याठिकाणी येत असतात.  देवीच्या दर्शनासाठी येणा-या प्रत्येक भाविकाला देवीदर्शनाचा सुलभ लाभ मिळावा, ही अपेक्षा असते. याच भावनेतून उस्मानाबादचे तत्कालिन जिल्हाधिकारी आणि श्री तुळजापूर मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम यांनी मंदिर विकासाचे काम हाती घेतले. तुळजापूर विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून या कामांना गती दिली आणि त्याचा प्रत्यक्ष परिणाम हा दिसून आला. प्रशासकीय नेतृत्वाने ठरविले तर सामान्य माणसाशी निगडीत असणारे प्रश्न आपण सहकाऱ्यांच्या मदतीने सोडवू शकतो, हेच डॉ. गेडाम यांनी दाखवून दिले. राजीव गांधी प्रशासकीय गतीमानता अभियान- 2011 च्या स्पर्धेत श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूरला राज्यपातळीवरील संयुक्तपणे मिळालेला प्रथम क्रमांक म्हणजे या कामाला मिळालेली पोचपावतीच जणू!
         मंदिर संस्थानने राबविलेले विविध उपक्रम, भाविकांकडून मिळणाऱ्या देणगीच्या हिशेबात आणलेली पारदर्शकता आणि मंदिरास मिळालेले आयएसओ मानांकन, येथील प्रशासकीय कामकाजात आणलेली सुसूत्रता याबाबत मंदिर संस्थानने केलेले काम दखलपात्र ठरले. कधीकाळी नवरात्रात होणाऱ्या प्रचंड गर्दीमुळे सामान्य भाविकांना दर्शन घेण्यासाठी अक्षरश: कसरत करावी लागायची. डॉ. गेडाम यांनी हे ओळखून दर्शन मंडपाची कल्पना मांडली आणि ती प्रत्यक्षात उतरवलीही. दर्शन मंडपामुळे भाविकांना रांगेतून येऊनच दर्शन घ्यावे लागल्याने विनाकारण होणारा त्रास टळला. काही पुजाऱ्यांकडून ‘दर्शन करुन देतो’ अशा प्रकारच्या आवाहनाला बळी न पडता भाविकांनी या नव्या पद्धतीचा स्वीकार केला. मंदिर परिसराची सुरक्षा त्यांनी अधिक बळकट केली. यामुळे होणाऱ्या गैरप्रकारांना आळा बसला. सार्वजनिक ठिकाणी शिस्तबद्ध वातावरण दिसू लागल्याने त्याचा सकारात्मक परिणाम संस्थानच्या इतर कामांवरही झाला. कामाचा वेग वाढला आणि मंदिर संस्थानच्या कामाने गती घेतली.
      तत्कालिन जिल्हाधिकारी डॉ. गेडाम यांनी त्यांच्या कार्यकाळात विविध उपक्रम हाती घेतले. पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांच्यासह संस्थानचे सर्व विश्वस्त व अधिकारी यांनी याकामी त्यांना मोलाचे सहकार्य केले. विद्यमान जिल्हाधिकारी डॉ. के. एम.नागरगोजे यांनीही हीच भूमिका पुढे नेत मंदिर संस्थानच्या कामात अधिक गती आणण्याचा प्रयत्न सुरु ठेवला आहे.
     केवळ एक वा दोन नव्हे तर सर्वांगीण बाबींचा विचार करुन मंदिर विकासाचा हा कार्यक्रम हाती घेण्यात आला. डॉ. गेडाम यांचे प्रशासकीय कौशल्य आणि सहकाऱ्यांना सोबत घेऊन, चांगले काम करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्याची त्यांची भूमिका मोलाची ठरली.
      मंदिर संस्थानने तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिराची दर्शन व्यवस्था व गर्दीचे नियंत्रण, देणगीची कार्यपद्धती, मौल्यवान वस्तूंच्या नोंदी व जतन, मंदिराचा अंतर्गत भाग व बाह्य परिसराच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्हीची यंत्रणा बसवणे, भाविकांच्या सोईसाठी ध्वनीप्रक्षेपण व्यवस्थेची सोय, मंदिर परिसरात खासगी सुरक्षा यंत्रणेच्या माध्यमातून मंदिर परिसराची सुरक्षा, मंदिर परिसराची स्वच्छता याबाबत विविध उपाययोजनना राबविल्या. कार्यालयीन वातावरणात सुधारणा व स्वच्छता, कार्यपद्धतीचे सुलभीकरण, लोकाभिमुख प्रशासन, आस्थापनाविषयक बाबी अद्यावत करणे, महसूल उत्पन्न वाढविणे अशा बाबींनाही महत्व देण्यात आले.
          दर्शन मंडपाच्या माध्यमातून मुखदर्शन आणि धर्मदर्शन अशा दोन रांगांद्वारे दर्शन अधिक सुलभ केले. मंदिर परिसरात सोललेले नारळ आणि पिशवीमधील तेल विक्रीस बंदी घातली. देणगी प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणली. सर्व दानपेट्या आणि परिसरावर सीसीटीव्हीची नजर ठेवण्यात आल्याने गैरप्रकारांना आळा बसला. देणगी स्वीकारण्याची, मोजण्याची, ठेवण्याची आणि हिशेबाची नवीन कार्यपद्धती सुरु करण्यात आली. मंदिर परिसरात स्वच्छतेला विशेष प्राधान्य देण्यात आले. भाविकांच्या सूचना व तक्रारींची दखल घेऊन त्यावर अंमलबजावणी करण्यात आली. याचा दृश्य आणि सकारात्मक परिणाम दिसून आला. दर्शन घेऊन देवीच्या गाभाऱ्यातून समाधानाने बाहेर पडणाऱ्या भाविकांची प्रसन्न मुद्रा जणू या चांगल्या कामांवर शिक्कामोर्तब करत असल्याचे चित्र आता दिसते. 
         याशिवाय, मंदिर संस्थानने भाविकांच्या सोईसाठी धर्मशाळा बांधल्या. वस्तूसंग्रहालय तयार केले.  मोठ्या प्रमाणात तुळजापूरला येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेऊन वाहनतळ उभारला. आयएसओ प्रमाणपत्र मिळालेले श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान हे राज्यातील पहिले तर देशातील पाचवे देवस्थान ठरले आहे.
           भाविकांसाठी केलेल्या या कामांचा विचार करुन मंदिर संस्थानने हा प्रस्ताव राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानासाठी पाठवला. विभागीय स्तरावर हा प्रस्ताव अव्वल ठरला. राज्यपातळीवरही मंदिर संस्थानने केलेल्या कामाचे सादरीकरण करण्यात आले. मंदिर संस्थानने राबविलेली विविध विकासकामे, भाविकांसाठी संकेतस्थळाची निर्मिती व त्यावर दर्शनाची ऑनलाईन सोय याबाबतची माहिती या प्रस्तावात देण्यात आली होती.
     विविध उपक्रमांचा विचार करुन आणि येथे राबविण्यात आलेल्या प्रशासकीय बाबींचा विचार करुन मंदिर संस्थानचा हा प्रस्ताव राज्यस्तरीय  स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा ठरला.  नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील, सामान्य प्रशासन विभागाच्या राज्यमंत्री श्रीमती फौजिया खान, मुख्य सचिव जयंत कुमार बाँठिया आदींची यावेळी उपस्थिती होती.
मंदिर संस्थानच्या वतीने डॉ. गेडाम यांच्यासह उपजिल्हाधिकारी  शिल्पा करमरकर, मंदिर संस्थानच्या विद्युत विभागाचे अभियंता ए.बी. चव्हाण, स्थापत्य अभियंता आर.एम. भोसले, जयसिंग पाटील,गजानन नरवडे, प्रशांत पुराणिक, राजेश भवळ यांनी या पुरस्काराचा स्वीकार केला.
        मंदिर संस्थानचे विश्वस्त सदस्य तथा उपविभागीय अधिकारी प्रशांत सूर्यवंशी, तुळजापूरचे तहसीलदार व्ही. एल.कोळी,  नगरपालिका नगराध्यक्ष या विश्वस्तांसह मंदिर संस्थानच्या सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनीही अगदी मनापासून या प्रयत्नांना प्रतिसाद दिल्यानेच मंदिर संस्थान हा मानाचा बहुमान मिळवू शकले.
       सध्याचे जिल्हाधिकारी डॉ. नागरगोजे यांनी हीच भूमिका कायम ठेवत मंदिर सुधारणेचा हा वेग कायम ठेवला आहे. कामात पारदर्शकता आणि विविध घटकांचे सहकार्य घेत भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री तुळजाभवानी मंदिर आणि श्रीक्षेत्र तुळजापुरचे रुप आता पालटले आहे. मंदिराचे विश्वस्त सदस्य तथा उपविभागीय अधिकारी प्रशांत सूर्यवंशी, सरव्यवस्थापक नरहरे, व्यवस्थापक नाइकवाडी यांच्या सहकार्याने आणि इतर अधिकारी-कर्मचारी यांच्या मदतीने तुळजापूर आता विकासाच्या एका नव्या टप्प्यावर येऊन ठेपले आहे.
 
-- दीपक चव्हाण
 
Top