उस्मानाबाद -: पिण्याच्या पाण्याची शुद्धता न तपासता ते पाणी पिण्यासाठी वापरु नये आणि जिल्हा परिषद, नगरपालिका तसेच आरोग्य यंत्रणेनेही पाणी शुद्ध करुनच ते नागरिकांना उपलब्ध करुन द्यावे. टॅंकरद्वारे पुरवठा होत असलेल्या भागात क्लोरिनेशन करुनच पाणी दिले जावे. साथरोगांची साथ उद्भवणार नाही, यासाठी या यंत्रणांनी आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. के. एम. नागरगोजे यांनी दिले,
      येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठक झाली. त्यावेळी डॉ. नागरगोजे यांनी हे निर्देश दिले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एल. हरिदास, महावितरणचे अधीक्षक अभियंता के. बी. राठोड, महाराष्ट् जीवन प्राधीकरणाचे अधीक्षक अभियंता एम. एस. भालेराव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी के.डी. बोणे, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक  रेड्डी, आठही तालुक्यांचे मुख्याधिकारी आदींची उपस्थिती होती.
       पाण्याचे स्त्रोत बहुतांशी ठिकाणी संपत आल्याने ग्रामीण व शहरी भागातील नागरिक मिळेल तेथून पाणी उपलब्ध करण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, नागरिकांनी दुषित पाणी पिऊ नये, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असून संबंधित यंत्रणांनी त्यासाठी पाणीपुरवठा करण्यात येणा-या  भागातील नागरिकांना लिक्विड क्लोरिनचे वाटप करणे, टॅंकरद्वारे करण्यात येणा-या पाण्याचे क्लोरिनेशन करणे आदी उपाययोजना तातडीने करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
     डॉ. नागरगोजे यांनी यावेळी तालुकानिहाय पाणीपुरवठा उपाययोजनांच्या सद्यस्थितीबाबत संबंधितांकडून माहिती घेऊन त्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. ज्या ग्रामपंचायती वीजबिलाचा ३३ टक्के वाटा तातडीने जमा करतील, त्यांचे ६७ टक्के वीजबिल शासन भरणार आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतींनी ही रक्कम तातडीने भरण्याबाबत जिल्हा परिषदेला सूचना दिल्या.
 
Top