उस्मानाबाद -: अभियांत्रिकी  प्रवेशासाठी आवश्यक असणारी सामाईक प्रवेश परीक्षा (एमटी-सीईटी-2013) ही परीक्षा 16 मे रोजी उस्मानाबाद शहरातील 8 परीक्षांकेंद्रावर होणार असून 2 हजार 520 विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहेत. या परीक्षेच्या पूर्वतयारी संदर्भात नुकतीच जिल्हाधिकारी डॉ.के.एम.नागरगोजे यांनी बैठक घेऊन ही परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात  पार पाडावी, असे निर्देश संबंधितांना दिले.
    या परीक्षेसाठीची बैठक व्यवस्था आणि परीक्षेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यासाठी शासकीय तंत्रनिकेतन उस्मानाबाद येथे 3 मे रोजी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.
    उस्मानाबाद शहरातील श्रीपतराव भोसले ज्युनिअर कॉलेजच्या नवीन इमारतीतील  तळमजला, पहिला, दुसरा व तिसरा मजला, श्रीपतराव भोसले ज्युनिअर कॉलेजच्या  जुन्या  इमारतीतील तळमजला व पहिला मजला, जिल्हा परिषद कन्या प्रशाला आणि  छत्रपती शिवाजी हायस्कुल येथे परीक्षा केंद्र असणार आहेत. या परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी पाण्याची व्यवस्था, वैद्यकीय मदत व्यवस्था तसेच परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना, परीक्षेसाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त आणि परीक्षेच्या कालावधीत अखंड वीजपुरवठा पुरविण्याचे निर्देश डॉ. नागरगोजे यांनी यावेळी दिले.
    या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, अप्पर पोलीस अधिक्षक बाळकृष्ण भांगे, परीक्षा विषयक जिल्हा समन्वयक पवार, परीक्षा केंद्र असणा-या शाळा, महाविद्यालयांचे मुख्याध्यापक व प्राचार्य आदींची उपस्थिती होती.
 
Top