परंडा -: दुष्‍काळाच्‍या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची परंडा (जि. उस्‍मानाबाद) येथे शनिवार दि. 11 मे रोजी सायंकाळी जाहीर सभा होणार आहे. ही सभा आगामी लोकसभा निवडणुकीची पूर्वतयारी असल्याचे बोलण्‍यात येत आहे.
    सध्‍या जनतेला दुष्काळाच्या तीव्र झळा सहन कराव्या लागत आहेत. त्यामुळे 55 गावे आणि 14 वाड्या-वस्त्यांवर पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. यासाठी शासनाने विहीर व कूपनलिकेच्या अधिग्रहणासाठी वर्षभरात 64 लाख रुपये खर्च केले आहेत. तरीही अनेक गावे पाण्यावाचून तहानलेलीच आहेत. 21 विहिरी, 72 कूपनलिकांचे अधिग्रहण करण्यात आले आहे. तर 11 गावांत 13 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. परंडा तालुक्यात पाण्याची पातळी 10 मीटरने खोलवर गेल्याने अधिग्रहण केलेले स्‍त्रोत कोरडे पडत आहेत. सेवाभावी संस्था तसेच भैरवनाथ शुगर वर्क्‍सने तालुक्यात 300 टाक्या ठेवून 30 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागात या उपक्रमाचे कौतुक होत आहे. सीना- कोळेगाव प्रकल्पाचा 20.40 दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे. तो पिण्यासाठी शासनाने आरक्षित केला आहे. तसेच साकत, खासापुरी, चांदणी, खंडेश्वरवाडी मध्यम प्रकल्प कोरडे पडल्याने या भागातील जनता तीव्र पाणीटंचाईचा सामना करीत आहे. पावसाळा कमी झाल्याने खरिपाबरोबर रब्बी हंगाम वाया गेला आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. रब्बीची आणेवारी 44 पैसे आली असूनही तसा अहवाल जिल्ह्याला पाठविला तरी अद्याप यावर ठोस निर्णय घेतला नाही. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे दुष्काळग्रस्तांना दिलासा देऊन, आपल्या भाषणातून काय बोलतात, याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. 'दुष्काळ गंभीर शिवसेना खंबीर' या घोषवाक्याची भित्तीपत्रके शहरात झळकत आहेत.

 
Top