कळंब -: उस्‍मानाबाद जिल्‍ह्यातील दुष्‍काळाची भीषणता पाहून दोराबजी टाटा ट्रस्‍ट मुंबई यांनी जिल्‍ह्यातील सहा गावांमध्‍ये पिण्‍याचे पाणी पुरवण्‍यासाठी दत्‍तक घेतली आहेत. कळंब तालुक्‍यातील हासेगाव (के) येथील पर्याय संस्‍थेच्‍या मदतीने हे काम केले जाणार आहे.
    भूम तालुक्‍यातील अंतरवली, नळीवडगाव व रामकुंड, वाशी तालुक्‍यातील तांदुळवाडी व कवडेवाडी तर कळंब तालुक्‍यातील नागझरवाडी येथे पाणीपुरवठा केला जाणार आहे. यासाठी पर्याय संस्‍थेचे कार्यकर्ते युध्‍दपातळीवर सदर कामासाठी कार्यरत आहेत. कळंब तालुक्‍यातील नागरझरवाडी येथील गावाशेजारच्‍या तलावातील विहिरीतील गाळ काढून विहीरीची साफसफाई करुन सिमेंटचे कडे बांधून डागडुजी केली जात आहे. तर वाशी तालुक्‍यातील कवडेवाडी वरची व खालची तसेच तांदुळवाडी, भूम तालुक्‍यातील रामकुंड येथे दोन टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे. तसेच अंतरवली व नळीवडगाव या दोन गावच्‍या सिमेवर असलेल्‍या तलावामध्‍ये चर खणून जनावरांच्‍या पिण्‍याच्‍या पाण्‍याची स्‍वतंत्र सोय करुन या दोन गावातील नागरिकांना पाणी मिळण्‍यासाठी तलावात आणखी एक स्‍वतंत्र विहीर घेतली आहे. त्‍याला पाणी भरपूर लागले असून उपलब्‍ध जुन्‍या पाईपलाईनद्वारे ते पाणी दोन गावामध्‍ये पोहचवले जाणार आहे. सहा गावांमध्‍ये जनावरांना पाणी मिळावे, यासाठी 20 पाण्‍याचे हौद ठेवले जाणार असल्‍याची माहिती पर्याय संस्‍थेचे सचिव विश्‍वनाथ तोडकर यांनी दिली आहे. हा उपक्रम यशस्‍वी होण्‍यासाठी विलास गोडगे, बालाजी शेंडगे, भिकाजी जाधव, जनाबाई गायकवाड आदीजण परिश्रम घेत आहेत.
 
Top